Chakan MIDC: Eknath Shinde’s Visit Today : चाकण MIDC मध्ये मंत्र्यांचे रविवारचे दौरे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाहणी करणार
२० कंपन्यांच्या स्थलांतराच्या चर्चेने प्रशासन धावले; उदय सामंत, आदित्य ठाकरे, रोहित पवार यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या पाहणी दौऱ्याची चर्चा
महावार्ता लाईव्ह | चाकण औद्योगिक वसाहतीतील खराब रस्ते, मोठमोठे खड्डे, सातत्याची वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे उद्योग, कामगार आणि स्थानिक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत या प्रश्नाने अचानक राज्यभराचे लक्ष वेधून घेतले आहे. चाकण MIDC मधील सुमारे २० कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याच्या वृत्ताने राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आणि त्यानंतर प्रशासन व सरकार अक्षरशः ॲक्शन मोडवर आले.
या पार्श्वभूमीवर आता चाकणच्या रस्त्यांची पाहणी करण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांचे दौरे सुरू आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी चाकणचा प्रश्न प्रत्यक्ष पाहणी करून मांडला. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चाकण दौऱ्याची चर्चा सुरू असून, यामुळे स्थानिक पातळीवर एकच सवाल उपस्थित होत आहे—मंत्र्यांना चाकणची खरी परिस्थिती पाहण्यासाठी रविवारचीच सुट्टी का लागते?
१० ऑगस्ट : २० कंपन्यांच्या स्थलांतराच्या बातमीने खळबळ
१० ऑगस्ट रोजी चाकण MIDC मधील खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीला कंटाळून सुमारे २० लघुउद्योग स्थलांतराच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले. या कंपन्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा MIDC कडे जाण्याच्या तयारीत असल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले. काही वृत्तांमध्ये या संभाव्य स्थलांतरामुळे हजारो रोजगारांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
यानंतर चाकण MIDCच्या प्रश्नावर राजकीय वातावरण तापले. उद्योजकांनीही पत्रकार परिषद घेऊन रस्ते, वाहतूक, वीज आणि इतर पायाभूत सुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
१३ ऑगस्ट : जिल्हाधिकारी आणि MIDC प्रशासनाची पाहणी
प्रश्न गंभीर झाल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी चाकणमध्ये पाहणी केली.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी १६ ऑगस्ट रोजी बैठक घेण्याचे जाहीर केले.
१४-१५ ऑगस्ट : रोहित पवार आणि आदित्य ठाकरेंचा चाकण दौरा
या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी चाकणमध्ये उद्योजकांशी संवाद साधत वाहतूक कोंडी, खराब रस्ते, वाढता उत्पादन खर्च आणि औद्योगिक वीजदर यांसारख्या प्रश्नांवर सरकारला लक्ष्य केले. त्यांनी चाकणमधील विविध वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणीही केली.
याच काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही चाकण MIDCचा पाहाणी दौरा केला.
रोहित पवारांचा सामंतांना थेट सवाल
उद्योगमंत्री उदय सामंत १६ ऑगस्टला, म्हणजेच रविवारी चाकणमध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांना थेट आवाहन केले होते.
“सुट्टीच्या दिवशी आणि पोलीस बंदोबस्तात चाकणची पाहणी करण्यापेक्षा एखाद्या कामाच्या दिवशी चाकणमध्ये या. कोणताही विशेष बंदोबस्त न घेता प्रत्यक्ष वाहतूक कोंडीतून प्रवास करा. तेव्हाच चाकणमधील उद्योग, कामगार आणि नागरिकांना दररोज कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, याची खरी जाणीव होईल,” असा रोखठोक संदेश पवार यांनी दिला होता.
१६ ऑगस्ट : उदय सामंत चाकणमध्ये; अडीच ते पावणेतीन तास बैठक
अखेर रविवार, १६ ऑगस्ट रोजी उद्योगमंत्री उदय सामंत चाकणमध्ये दाखल झाले. त्यांनी चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, वाहतूक, पावसाच्या पाण्याचा निचरा, अतिक्रमणे आणि पार्किंगच्या प्रश्नांची पाहणी केली. त्यानंतर उद्योजक आणि अधिकाऱ्यांसोबत दीर्घ बैठक झाली. या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाइन सहभागी झाले होते. रस्ते दुरुस्ती, वाहतूक व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांवर उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात आले.
उद्योगमंत्री सामंत यांनी चाकणमधून २० उद्योग बाहेर जाण्याबाबतच्या चर्चांना ‘नुसत्या चर्चा’ असे म्हटले आणि रस्ते व पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची माहिती दिली.
२३ ऑगस्ट : चाकणच्या प्रश्नासाठी गणेश बोत्रेंचे आमरण उपोषण
स्थानिक जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी चाकण MIDCमधील खड्डे, वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात चार दिवस आमरण उपोषण केले. या आंदोलनाला चाकण औद्योगिक परिसरातील अनेक कंपन्या, कामगार, स्थानिक नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला. चाकणचा प्रश्न केवळ राजकीय चर्चेपुरता मर्यादित न राहता उद्योग आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असल्याचे या आंदोलनातून अधोरेखित झाले. बोत्रे यांच्या आंदोलनानंतर आणि कंपन्यांच्या स्थलांतराच्या चर्चेनंतर प्रशासन व राज्य सरकारचेही चाकणच्या समस्यांकडे लक्ष वेधले गेले.
आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची चर्चा
उद्योगमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाकणच्या रस्त्यांची पाहणी करण्यासाठी आज ( २३ ऑगस्ट रविवार ) येणार आहेत . त्यामुळे चाकणमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे.
मात्र याच वेळी स्थानिक नागरिक, कामगार आणि उद्योजकांमध्ये एक वेगळाच प्रश्न चर्चिला जात आहे—चाकणची खरी वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची अवस्था पाहण्यासाठी पुन्हा रविवारच का?
कारण रविवारच्या दिवशी औद्योगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे कामकाज तुलनेने कमी असते. त्यामुळे ज्या रस्त्यांवर आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी सकाळपासून वाहनांच्या रांगा लागतात, हजारो कामगारांची ये-जा असते, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दी असते आणि तासन्तास वाहतूक ठप्प होते, ती खरी परिस्थिती रविवारी पूर्णपणे जाणवेलच असे नाही.
कामाच्या दिवशी दौरा करा; मग कळेल चाकणची खरी परिस्थिती!
चाकणचा प्रश्न केवळ रस्त्यांवरील खड्ड्यांचा नाही. हा प्रश्न उद्योग, रोजगार, कामगार, मालवाहतूक, वेळ, उत्पादन आणि स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेला आहे.
त्यामुळे मंत्र्यांनी रविवारी नियोजित दौऱ्याऐवजी एखाद्या सोमवार, मंगळवार किंवा अन्य कामाच्या दिवशी सकाळच्या गर्दीच्या वेळी चाकणमध्ये यावे. कोणताही विशेष बंदोबस्त न घेता सामान्य वाहनातून प्रवास करावा आणि प्रत्यक्ष वाहतूक कोंडीत अडकून परिस्थिती अनुभवावी, अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे.
कार्यालयात बसून मिळणारे अहवाल आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उभे राहून दिसणारी परिस्थिती यात मोठा फरक असतो.
चाकणमध्ये रोज हजारो कामगार कामावर येतात. कंपन्यांची वाहने, कंटेनर, ट्रक, ट्रेलर आणि इतर मालवाहतूक करणारी वाहने यामुळे वाहतुकीवर प्रचंड ताण येतो. रस्त्यांवरील खड्डे, अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणे आणि अरुंद रस्ते यामुळे परिस्थिती आणखी बिकट होते.
आश्वासनांपेक्षा आता कृतीची प्रतीक्षा
चाकण MIDCचा प्रश्न गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. २० कंपन्यांच्या स्थलांतराच्या चर्चेपासून सुरू झालेल्या या विषयावर आता मंत्र्यांचे दौरे, बैठका, पाहण्या आणि आश्वासने सुरू झाली आहेत.
प्रशासनाने ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते आणि वाहतुकीसंदर्भातील उपाययोजनांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. पुढे रस्ते दुरुस्ती, बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई, अतिक्रमण हटविणे, वाहतूक व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा सुधारण्याच्या उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
मात्र चाकणकरांचा प्रश्न आता एकच आहे..!
दौरे कितीही झाले, बैठका कितीही झाल्या, आश्वासने कितीही मिळाली तरी प्रत्यक्ष रस्त्यांवरील खड्डे कधी बुजणार? वाहतूक कोंडी कधी सुटणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाकण MIDCमधील उद्योगांना व कामगारांना रोजच्या त्रासातून कायमची मुक्ती कधी मिळणार?
आता चाकणकरांना रविवारच्या पाहणीपेक्षा कामाच्या दिवशीची खरी परीक्षा आणि आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी अपेक्षित आहे.