Rajgurunagar sarkari bank election | राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदाची निवड बुधवारी होणार! रामदास धनवटे यांच्याच गळ्यात पडणार ‘माळ’?
अश्विनी पाचारणेंचा राजीनामा, उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी (२५ मार्च) निवडणूक ; शेतकरी, उद्योजक आणि खातेदारांसाठी महत्त्वाची बँक ; निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष
महावार्ता लाईव्ह | उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अग्रगण्य व विश्वासार्ह सहकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदाची निवड येत्या बुधवारी (ता.२५ मार्च) होणार आहे. व्यवसाय, गृह,|वाहन, शेती, कुक्कुटपालन आदी विविध क्षेत्रांसाठी कर्जपुरवठा करणारी ही बँक जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक आणि सामान्य खातेदारांसाठी महत्वाची समजली जात आहे.
बँकेच्या उपाध्यक्षपदावर असलेल्या अश्विनी राजेंद्र पाचरणे यांनी डिसेंबर २०२५ मध्ये राजीनामा देणे अपेक्षित होते. परंतु जिल्हा परिषद निवडणुकीत त्या उमेदवार असल्याने त्यांचा राजीनामा झाला नाही.परंतु जिल्हा परीषद निवडणूक होताच त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले.त्यामुळे संचालक मंडळाने विशेष सभा बोलावून उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर केली आहे.या निवडणुकीकडे बँकेचे सभासद, खातेदार, शेतकरी, उद्योजक आणि हितचिंतक यांचे विशेष लक्ष लागले आहे.
राजगुरुनगर सहकारी बँक ही खेड तालुक्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा भागवणारी प्रमुख संस्था आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी, कुक्कुटपालकांना पोल्ट्री व्यवसायासाठी, छोट्या उद्योजकांना व्यवसाय विस्तारासाठी, तसेच सामान्य नागरिकांना गृह व वाहन कर्जांसाठी ही बँक सातत्याने कर्जपुरवठा करते. बँकेच्या या सेवेमुळे खेड परिसरातील अनेक शेतकरी आणि व्यावसायिकांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे.
पाचारणे यांच्या राजीनाम्यामुळे बँकेच्या दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही,असे संचालक मंडळाने स्पष्ट केले आहे.मात्र, या रिक्त पदासाठी निवडणूक होणे अपरिहार्य ठरले आहे. सध्या बँकेतर्फे सुरू असलेल्या चर्चा आणि माहितीनुसार,उपाध्यक्षपदाची ‘माळ’ रामदास नारायण धनवटे यांच्याच गळ्यात पडणार असल्याचे बोलले जात आहे. बँकेचे संचालक म्हणून रामदास धनवटे यांचा अनुभव पाहता,ते बँकेच्या विकासात सक्रिय भूमिका बजावत आहेत. त्यांच्या संभाव्य निवडीमुळे बँकेच्या कामकाजाला नवी गती मिळेल,अशी अपेक्षा सभासदांकडून व्यक्त केली जात आहे.
बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि विविध कार्यक्रमांत सभासदांनी उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे उत्सुकतेने पाहिले आहे. बँकेच्या प्रगतीसाठी स्थिर आणि अनुभवी नेतृत्वाची गरज असल्याचे मत अनेक खातेदारांनी व्यक्त केले.बुधवारी होणाऱ्या निवडणुकीत एकमेव उमेदवार असेल की स्पर्धा होईल, याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे.
राजगुरुनगर सहकारी बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून,खेड तालुक्यातील सामाजिक व आर्थिक विकासाची प्रमुख घडी आहे.उपाध्यक्षपदाच्या या निवडणुकीचा निकाल बँकेच्या भवितव्यावर आणि खातेदारांच्या विश्वासावर मोठा परिणाम करणार आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सविस्तर माहिती महावार्ता लाईव्ह चॅनेल कडून दिली जाईल.