भामा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध संपला; अमोल डांगलेचा मृतदेह पाचव्या दिवशी सापडला

नाईट शिफ्टवरून घरी परतताना पुराच्या लोंढ्यात दुचाकीसह वाहून गेला होता; ग्रामस्थ, पोलीस, महसूल प्रशासन आणि NDRF च्या पाच दिवसांच्या शोधमोहीमेनंतर शेलू बंधाऱ्याजवळ भामा नदीपात्रात मृतदेह आढळला.

भामा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध संपला; अमोल डांगलेचा मृतदेह पाचव्या दिवशी सापडला

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील शेलू येथे सोमवारी (दि.६) पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून गेलेला कडूस गावच्या डांगले शिवार येथील अमोल विलास डांगले (वय २८) या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी (दि.१०) रोजी पाचव्या दिवशी दुपारी शेलू बंधारा जवळील भामा नदीपात्रालगत सापडला आहे.


खेड तालुक्यात सलग दोन तीन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने ओढे,नाले व भामा नदीला पूर आला होता.अमोल डांगले हा तरुण नाईट शिप्ट करून दुचाकीवरून आपल्या घरी जाण्यासाठी सोमवारी (दि.६) सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान शेलू येथून जात असताना ओढ्यातील पुराचे पाण्याचा लोंढा अंगावर आला आणि त्यात तो दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती. 


घटनेच्या दिवशीच दुचाकी कठड्याला अडकल्याने सापडली पण अमोलचा शोध लागला नाही.त्याचा भामा नदीच्या प्रवाहात ग्रामस्थ,पोलीस व महसूल प्रशासन आणि एनडीआरएफ चे पथक शोध घेत होते.परंतु त्याचा मृतदेह सापडत नव्हता.अखेर पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि.१०) रोजी दुपारच्या दरम्यान त्याचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत घटना घडली त्याच जवळच्या परिसरात सापडला.


प्राथमिक माहितीनुसार,कडूस गावातील डांगले शिवार येथील रहिवासी अमोल डांगले हा तरुण एमआयडीसी क्षेत्रातील एका कंपनीत कामाला होता. नाईट शिफ्ट संपवून दुचाकीवरून घरी परतत होता. शेलू येथील भामानदीच्या पुलावरून पुढे जात असताना ओढ्याच्या पुराचा पाण्याचा मोठा लोंढा अमोलच्या अंगावर आला आणि तो पाण्यात वाहुन गेल्याची घटना घडली. 

 

दुचाकी बंधाऱ्याच्या कठड्याला अडकली होती.त्यामुळे अमोल मृतदेह देखील त्याच ठिकाणी असणार अशी शंका अनेकांनी व्यक्त केल्याने घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथकांकडून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू होती. अखेर त्याच परिसरात पाचव्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला. अमोल डांगले या तरुणांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.