Gas cylinder | चाकण परिसरात घरगुती गॅस टंचाईमुळे नागरिकांचा संताप; पुणे-नाशिक महामार्ग अडवला
चाकणमध्ये घरगुती गॅस टंचाईचा उद्रेक; नागरिकांनी पुणे-नाशिक हायवे अडवला ;गॅस नाही, जेवण नाही! चाकण कामगारांवर उपासमारीची वेळ
महावार्ता लाईव्ह | पुण्यातील चाकण औद्योगिक परिसरात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे स्थानिक नागरिक आणि कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या संकटामुळे अनेकांना स्वयंपाकासाठी गॅस मिळत नसल्याने संताप ओसाड झाला. आज सकाळी चाकण परिसरातील काही नागरिकांनी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग (हायवे) अडवून तीव्र निदर्शने केली. यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि चाकण वाहतूक पोलीस तसेच दक्षिण चाकण पोलिसांना मोठ्या प्रमाणात धावपळ करावी लागली.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आखाती युद्ध (इराण-अमेरिका-इस्रायल संघर्ष) आणि जागतिक तणावामुळे एलपीजी गॅसचा पुरवठा मोठ्या प्रमाणात बाधित झाला आहे. परिणामी, HPCL सारख्या कंपन्यांबाहेर ट्रक आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. घरगुती गॅस मिळत नसल्याने अनेकांना काळ्या बाजारातून एक किलो गॅससाठी ५०० ते ७०० रुपयांपर्यंत मोजावे लागत आहेत. कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली असून, सामान्य जनतेचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
हायवे अडवण्याची घटना
सकाळी साडेनऊ ते अकरा वाजेच्या सुमारास चाकण परिसरातील काही स्थानिक रहिवासी आणि कामगारांनी हायवे रोखून ठेवला. त्यांनी "गॅस द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू", अशा घोषणा देत निदर्शने केली. अचानक हायवे अडवल्याने पुणे-नाशिक मार्गावरील वाहतूक कोंडीत अडकली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. चाकण वाहतूक शाखा आणि दक्षिण चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सुमारे एक ते दीड तासानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली, मात्र नागरिकांचा रोष कायम आहे.
नागरिकांचे म्हणणे..
"युद्धाच्या परिस्थितीमुळे आम्ही काय करायचे? घरात चूल पेटवायला गॅस नाही, मुलांना जेवण कसे बनवायचे? सरकारने त्वरित पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू," असे एका स्थानिक कामगाराने सांगितले. अनेकांनी सांगितले की, सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे पॅनिक खरेदी सुरू झाली असून, एजन्सीसमोर १-२ किलोमीटर लांबीच्या रांगा लागत आहेत. काही ठिकाणी अवैध काळ्या बाजारात गॅस विक्री सुरू असल्याच्या तक्रारीही आहेत.