president of Katraj Dudh Sangh Arun Chambhare | माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांचा दबदबा कायम; कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदी अरुण चांभारे यांची बिनविरोध निवड

पुणे जिल्ह्याच्या राजकारणात खेड तालुक्याला मोठी संधी; राष्ट्रवादी काँग्रेसची सहकार क्षेत्रातील पकड आणखी मजबूत

president of Katraj Dudh Sangh Arun Chambhare | माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांचा दबदबा कायम; कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदी अरुण चांभारे यांची बिनविरोध निवड

 

महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदी अरुण सीताराम चांभारे यांची बिनविरोध निवड झाली. चांभारे हे खेड तालुक्याचे माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक दिलीप मोहिते पाटील यांचे गोटातील विश्वासू सहकारी व कट्टर समर्थक म्हणून खेड तालुक्यात ओळखले जातात. चांभारे यांनी यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन खात्याचे माजी सभापती म्हणून काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष यांची एकहाती सत्ता असलेल्या या महत्त्वाच्या जिल्ह्यातील सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदावर खेड तालुक्याच्या प्रतिनिधीची निवड झाल्याने तालुक्याच्या राजकीय व सहकार क्षेत्रात मोठी भर पडली आहे.

 

दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब

कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदी अरुण चांभारे यांची झालेली निवड ही केवळ एका पदाची निवड नसून,खेड तालुक्याचे कर्तबगार माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या राजकीय आणि संघटनात्मक ताकदीची प्रचिती मानली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सहकार,कृषी आणि स्थानिक राजकारणात सक्रिय असलेल्या मोहिते पाटील यांनी खेड तालुक्यात मजबूत पकड निर्माण करून तालुक्यात नेतृत्व उभे केले आहे. त्यांच्या जवळच्या समर्थकाला राज्यात नावाजलेल्या जिल्हास्तरीय दूध संघाच्या सहकारी संस्थेचे थेट अध्यक्षपद मिळाल्याने त्यांच्या प्रभावाला अधिक गतिमान होण्यासारखे बळ मिळाले आहे.

 

खेड तालुक्याला मिळाले जिल्हास्तरीय महत्त्वाचे प्रतिनिधित्व

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ही जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांशी निगडित अत्यंत महत्त्वाची संस्था मानली जाते. अशा संस्थेच्या अध्यक्षपदी खेड तालुक्यातील व्यक्तीची निवड झाल्याने तालुक्याला जिल्हा पातळीवर प्रभावी प्रतिनिधित्व मिळाले आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, मागण्या आणि विकासाच्या प्रश्नांना अधिक सक्षम व प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसची सहकार क्षेत्रातील पकड अधिक मजबूत

कात्रज दूध संघावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे एकहाती वर्चस्व कायम असून, अरुण चांभारे यांच्या निवडीमुळे पक्षाची सहकार क्षेत्रातील ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

 

दूध उत्पादकांच्या अपेक्षा वाढल्या

अरुण चांभारे यांच्याकडे एक सच्चा कार्यकर्ता असल्याने आता जिल्ह्यासह खेड तालुक्यातील असलेल्या असंख्य दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.दूध संकलन, उत्पादकांना योग्य दर, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि संघाच्या आर्थिक बळकटीसाठी नव्या योजना राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. अध्यक्षपदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दूध व्यवसायाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा जिल्ह्यातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

 

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

अरुण चांभारे यांच्या बिनविरोध निवडीनंतर खेड तालुक्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यासह खेड तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी,जिल्हा सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी चांभारे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.