Raided the donation box of a Mauli in Alandi | आळंदीतील माऊलींच्या दानपेटीवर सेवेकऱ्याचा डल्ला; घरातून पावणेचार लाखांची रोकड जप्त
दानपेटीतील रक्कम मोजताना सेवेकऱ्याची हातचलाखी उघड ; हारांच्या पिशव्यांमध्ये लपवून नेली जात होती रोकड ; घरझडतीत १०, २०, ५० व १०० रुपयांच्या नोटांचा खजिना सापडला
महावार्ता लाईव्ह | संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र नगरी आळंदी येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून मंदिरातील दानपेटीतील रकमेवरच एका सेवेकऱ्याने डल्ला मारल्याचे समोर आले आहे. दानपेटीतील पैसे जमा करण्याच्या कामावर असलेल्या विशाल वारुळे या सेवेकऱ्याच्या घरातून विविध मूल्यांच्या नोटांनी भरलेल्या पिशव्यांमध्ये तब्बल पावणेचार लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल वारुळे हा गेल्या तीन महिन्यांपासून मंदिरातील दानपेटीतील रक्कम जमा करणे व मोजणीचे काम पाहत होता. या कामाचा गैरफायदा घेत त्याने दानपेटीतील काही रक्कम स्वतःकडे वळवण्यास सुरुवात केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दानपेटीतील रक्कम मोजताना तो हातचलाखी करून १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा वेगळ्या पिशवीत भरत असे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संशय येऊ नये म्हणून विशाल वारुळे मंदिरातील हार किंवा पूजेचे साहित्य घरी नेत असल्याचे सांगत असे. त्याच पिशवीत वरच्या बाजूस हार ठेवले जात, तर खाली मोठ्या प्रमाणात रोकड लपवली जात होती. त्यामुळे कोणाच्याही नजरेत हा प्रकार येत नव्हता.
घरी आणलेली रोकड तो नियमितपणे मोजत असे आणि नंतर ती रक्कम असलेल्या पिशव्या घरातील बेडमध्ये जशाच्या तशा ठेवत होता. संबंधित यंत्रणांनी घराची झडती घेतली असता विविध पिशव्यांमध्ये साठवून ठेवलेली मोठी रोकड आढळून आली. प्राथमिक तपासात सुमारे पावणेचार लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
हा प्रकार गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असल्याचा अंदाज तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मंदिरातील दानपेटीतील एकूण किती रक्कम अपहार करण्यात आली, याचा शोध घेण्यासाठी संबंधित आर्थिक नोंदी, सीसीटीव्ही फुटेज आणि दानपेटी मोजणी प्रक्रियेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
देवस्थानाशी संबंधित अत्यंत संवेदनशील प्रकरण असल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातील दानपेटीवरच डल्ला मारल्याने भाविकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
