खेड तालुक्यातील जऊळके खुर्द येथील घटना ; पुतण्याने केला चुलता-चुलतीवर जीवघेणा हल्ला

खेड तालुक्यातील जऊळके खुर्द येथील घटना ; पुतण्याने केला चुलता-चुलतीवर जीवघेणा हल्ला

राजगुरूनगर : घरासमोरील गाडीतील टेपरेकॉर्डचा मोठा आवाज कमी करण्याचे सांगितल्याचे कारणावरून चुलता व चुलतीवर पुतण्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना खेड तालुक्याच्या  जउळके खुर्द येथील कराळेवस्तीत रविवारी (दि १३) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली.लोखंडी गजाने मारहाण  केल्याने चुलता व चुलती गंभीर जखमी असून चुलती अत्यंत सिरीयस अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, कराळेवस्ती, येथे रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या पुतण्याने घराजवळ उभी असलेल्या इको ( एमएच १४ जी एम २१७४ ) या गाडीतील टेप लावून त्याचा आवाज वाढवला होता.आवाज कमी कर असे सांगण्यासाठी एकनाथ गेनभाऊ कराळे(वय ४६) हे गेले असता पुतण्या वैभव पंढरीनाथ कराळे यांच्यात वाद झाला.वादाचे रूपांतर भांडणात आणि नंतर हाणामारीत झाले.तु मला कोण सांगणार? तु माझा बाप आहे का? तुला आता खल्लास करून टाकतो? अशी शिवीगाळ दमदाटी करून गाडीत असलेला लोखंडी रॉड घेऊन वैभव कराळे खाली उतरला. त्यावेळी तेथे वैभवचे वडील पंढरीनाथ गेणभाऊ कराळे हे होते.या दोघांमध्ये हाणामारी झाली.एकनाथ कराळे यांच्या पत्नी हाणामारी सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही गजाने मारहाण करण्यात आली.यात फिर्यादी व त्याची पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.पुतण्या वैभव पंढरीनाथ कराळे व भाऊ पंढरीनाथ गेनभाऊ कराळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बाप लेकांची नावे आहेत.

या घटनेत वैभव कराळे याने चुलता-चुलतीला डोक्यात, तोंडावर व डोळ्यावर गजाने मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत. जखमी एकनाथ गेनभाऊ कराळे यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खेड पोलिसांनी पंढरीनाथ व वैभव कराळे यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्यावरून गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट करीत आहेत.