पालकमंत्री सुनेत्रावहिनींचे आश्वासन ; करंजविहिरे–गडद–वांद्रा (प्रजिमा-17) रस्त्यासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील आक्रमक; अधिकाऱ्यांना खडे बोल

पहिल्या टप्प्यात 20 किमी रस्त्याचे काम; उर्वरित मार्ग पीएमआरडीए व भीमाशंकर विकास आराखड्यातून करण्याची मागणी

पालकमंत्री सुनेत्रावहिनींचे आश्वासन ; करंजविहिरे–गडद–वांद्रा (प्रजिमा-17) रस्त्यासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील आक्रमक; अधिकाऱ्यांना खडे बोल

 

महावार्ता लाईव्ह | करंजविहिरे–गडद–वांद्रा या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 17 (प्रजिमा-17) रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने परिसरातील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. यावेळी करंजविहिरे–गडद–वांद्रा मार्गाचा भीमाशंकर मार्ग म्हणून सर्वांगीण विकास करण्यात यावा, असे निवेदनही माजी आमदार मोहिते पाटील यांना देण्यात आले.

 

निवेदनाची गंभीर दखल घेत मा.आमदार मोहिते पाटील यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) तसेच जलजीवन मिशनच्या संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे त्वरित बुजविणे, साईड पट्ट्या भरणे आणि नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी कामातील दिरंगाईबाबत त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तीव्र शब्दांत सुनावल्याचेही समजते.

 

याचबरोबर प्रजिमा-17 या संपूर्ण रस्त्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजित पवार यांच्याकडे पीएमआरडी, पुणे टूर सायकलिंग मार्ग तसेच भीमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत या रस्त्याचा समावेश करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच पालकमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनाही याबाबत पत्र पाठविण्यात आले.

 

आमदार मोहिते पाटील यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली असता, पावसाळा संपल्यानंतर पुढील तीन ते चार महिन्यांत या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पहिल्या टप्प्यात सुमारे 20 किलोमीटर रस्त्याचे काम हाती घेतले जाईल, तर उर्वरित करंजविहिरे–वांद्रा (प्रजिमा-17) मार्गाचे काम पीएमआरडीच्या माध्यमातून पूर्ण करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

या आश्वासनामुळे अनेक वर्षांपासून खराब रस्त्यामुळे त्रस्त असलेल्या परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आता प्रत्यक्ष कामाला लवकरात लवकर सुरुवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना निवेदन देताना गडद गावचे सरपंच चंद्रकांत किसन शिंदे, देशमुखवाडीचे सरपंच दत्तात्रय देशमुख, वहागावचे सरपंच कैलास नवले, शिवेचे माजी सरपंच अक्षय शिवेकर, निवृत्ती नवले, सतीश खेंगले, सखाराम शिंदे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.