Khed student suicide | कोहिंडे खुर्द आश्रम शाळेत दहावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या; शाळेच्या दुसऱ्या दिवशी दुर्दैवी घटना
शिक्षणासाठी आली आश्रम शाळेत... पण दुसऱ्याच काळाने घातला घाला; १५ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूने खेड तालुका हादरला
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील आंबोली जवळच्या कोहिंडे खुर्द येथील शासकीय आश्रम शाळेत दहावीत शिक्षण घेणाऱ्या पायल शिवाजी पारधी (वय १५,रा.कोये, ता.खेड ,जि.पुणे ) या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार (दि.१६) रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे तालुक्यात आणि विशेषतः आश्रम शाळा परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,पायल शिवाजी पारधी (वय १५) ही विद्यार्थिनी कोहिंडे खुर्द येथील आदिवासी शासकीय आश्रम शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच १५ जून २०२६ रोजी ती येथील वसतिगृहात दाखल झाली होती. मात्र शाळेच्या दुसऱ्या दिवशी तिने टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास पायलने वस्तीगृहातील खोलीच्या छताला असलेल्या हुकाला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतल्याचे समोर आले. काही वेळानंतर ही बाब निदर्शनास आल्यानंतर शाळा प्रशासन व इतर विद्यार्थिनींमध्ये एकच गोंधळ उडाला. तिला तातडीने खाली उतरविण्यात आले; मात्र तोपर्यंत तिचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजगुरूनगर जवळच्या चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. विद्यार्थिनीने हे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कौटुंबिक, शैक्षणिक किंवा इतर कोणत्या कारणामुळे हा प्रकार घडला का, याचा सूक्ष्म तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कोहिंडे खुर्द परिसरासह संपूर्ण खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून तीच्या आत्महत्येबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आश्रम शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्नही या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
विद्यार्थिनी आत्महत्या करीत असताना शाळा प्रशासन म्हणजेच तेथील मुख्याध्यापक, शिक्षक व अन्य असणारा कर्मचारी स्टाफ यावेळी काय करीत होता. शाळेचे मुख्याध्यापक व अन्य कर्मचारी वर्ग शाळेत उपस्थित नव्हता का ? शिक्षक बोलल्याच्या रागातून की विद्यार्थीनी मध्ये झालेल्या भांडणातून की कौटुंबिक कारण की अन्य कारणाने तीने आत्महत्या केली हे सर्व पोलिसांच्या सूक्ष्म तपासानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
