माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी फिरवली 'भाकरी'; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) खेड तालुकाध्यक्षपदी अंकुश राक्षे यांची नियुक्ती
कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र; मोहिते पाटलांचा विश्वासू सहकारी पुन्हा चर्चेत
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार ) संघटनेत महत्त्वाचा बदल करत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तालुकाध्यक्षपदाची धुरा माजी पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांच्या हाती सोपवली आहे.पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून, मोहिते पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या राक्षे यांच्या खांद्यावर आता तालुक्यात पक्ष विस्ताराची जबाबदारी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते अंकुश राक्षे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे,माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे तसेच माजी नगरसेवक शंकर राक्षे यांच्यासह तालुक्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अंकुश राक्षे यांनी यापूर्वी खेड पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले असून, तालुक्यातील संघटनात्मक कामकाजात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांची ओळख खेड तालुक्यात असून, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे.
दरम्यान, अंकुश राक्षे यांच्या पत्नी वसुधा राक्षे यांनी चास-कडूस जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती.परंतु अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत त्यांना थोडक्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, आता अंकुश राक्षे यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या राजकीय वजनात वाढ झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
नियुक्तीनंतर बोलताना अंकुश राक्षे म्हणाले की, "उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार आणि माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, तळागाळातील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्षविस्ताराचे काम प्रामाणिकपणे करणार आहे."
राक्षे यांच्या नियुक्तीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) संघटनात्मक पातळीवर अधिक सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.