Crime | खेड तालुक्यातील तरुणाचा जालन्यात खून : '१० लाख देतो' म्हणून तरुणाला कारमध्ये नेले, मित्रानेच केली हत्या
पैशाच्या वादातून खून! पुण्याहून आणलेला २० वर्षीय तरुण जालन्यात संपवला : जीवलग मित्राचा विश्वासघात: १० लाखांच्या बहाण्याने अथर्वची हत्या
महावार्ता लाईव्ह | महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात एक धक्कादायक हत्येची घटना उघडकीस आली आहे. खेड तालुक्यातील २० वर्षीय तरुण अथर्व गणेश लोखंडे याची त्याच्या जीवलग मित्राने पैशांच्या वादातून थंड डोक्याने हत्या केली. या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
घटना कशी घडली ?
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मरकळ येथील रहिवासी अथर्व गणेश लोखंडे (वय २०) याच्यावर त्याचा मित्र किसन उर्फ कृष्णा राजाराम धोत्रे (वय ३५, रा. आडगाव तांडा, ता. जिंतूर, जि. परभणी; सध्या काळजेवाडी, चांहोर्ली खुर्द, ता. हवेली, जि. पुणे) याने पैशांच्या व्यवहारातून वाद झाला. या वादानंतर आरोपी किसनने अथर्वला "१० लाख रुपये देतो" असे सांगून कारमध्ये बसवले आणि जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पेवा गावाकडे नेले.
तेथे आरोपीने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने अथर्वचा दोरीने गळा आवळून खून केला. हत्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे हात-पाय बांधले, पोटाजवळ दगड लावला आणि गावातील ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा विहिरीत फेकून दिला.
मृतदेह सापडला आणि खळबळ
५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी पेवा गावातील काही नागरिकांना विहिरीत तरंगता मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ मंठा पोलीस ठाण्याला कळवले. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पांढऱ्या टी-शर्टमध्ये, हात-पाय दोरीने बांधलेले आणि गळ्यावर आवळण्याचे निशाण असलेला होता. प्रथमदर्शनी हा खून असल्याचे स्पष्ट झाले.
पेवा गावचे पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासात उलगडा आणि अटक
मंठा पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला. २४ तासांच्या आत मृतदेहाची ओळख पटवली आणि मुख्य आरोपी किसन उर्फ कृष्णा राजाराम धोत्रे यास ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, पैशांच्या कारणावरून वाद झाल्यानंतर १० लाखांच्या बहाण्याने अथर्वला पेवा शिवारात आणले आणि साथीदारांसह हत्या केली.
या घटनेने पुन्हा एकदा मैत्री आणि पैशांच्या नात्यातील विश्वासघाताचे भयावह रूप समोर आले आहे. अथर्वच्या नातेवाइकांना मोठा धक्का बसला असून, न्यायाची मागणी केली जात आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
