शिवे ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न.'आमचा गाव आमचा विकास' या विषयावर अक्षय शिवेकर यांचे मार्गदर्शन
चाकण : प्रतिनिधी
खेड तालुक्यातील शिवे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अनेक विषयांवर वादळी चर्चा झाली.संपूर्ण ग्रामसभेचे व्हिडीओ शूटिंग करण्यात येऊन ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न झाली.
ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच ज्ञानेश्वर शिवेकर यांचे अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित केली होती.सभेत प्रास्ताविक केल्यानंतर विषय पत्रिकेवरच्या एकुण २८ विषयांवर चर्चा करण्यात आली. पाणी,लाईट,रस्ते अशा अनेक विषयांवर ग्रामस्थांनी जोरदार वादळी चर्चा करुन आपले प्रश्न मांडले.तसेच ग्रामसभेत आलेले अर्ज वाचून त्यावर चर्चाही करण्यात आली.सरपंच ज्ञानेश्वर शिवेकर व ग्रामपंचायत सदस्य अक्षय शिवेकर आणि ग्रामसेविका सविता बोरकर यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत उपस्थित प्रश्न सोडवून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.अक्षय शिवेकर यांनी १५ वा वित्त आयोग निधी 'आमचा गाव आमचा विकास' या विषयावर ग्रामसभेत सविस्तरपणे माहिती दिली.गावातील अनेक विषयावर एकमेकांत खरमरीत चर्चा झाली असताना उपस्थित केलेले काही प्रश्न अनुत्तरीत राहिल्याने पुढील ग्रामसभेत घेऊन त्यावर चर्चा करण्याचे ग्रामसभेत सर्वानुमते ठरले.
ग्रामसभेला पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य चांगदेव शिवेकर,मंडल अधिकारी राजेंद्र वाघ,पोलीसपाटील ज्ञानेश्वर साळुंके,उपसरपंच निर्मला मारती कोळेकर,ग्रामपंचायत सदस्य आनंद साकोरे,कविता शिवेकर,विनायक शिवेकर,दीपाली कोळेकर,ललिता गडदे, तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम शिवेकर,चेअरमन नामदेव शिवेकर आदीसह गावचे आजीमाजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामसभेत वादळी चर्चा झडली,परंतु सभा सुरळीत पार पडली.
-------------------------------------------------------------------------
