खेड तालुक्यातील शिंदे गावचे ज्येष्ठ शेतकरी जेजेराम (आप्पा) टेमगिरे यांचा दशक्रिया विधी उद्या ; शेती आणि समाजकार्यातील योगदान कायम स्मरणात

शेती, दुग्धव्यवसाय आणि गावाच्या विकासासाठी आयुष्यभर झटलेल्या आदर्श व्यक्तिमत्त्वाला अखेरचा निरोप; उद्या सकाळी ८ वाजता दशक्रिया विधी

खेड तालुक्यातील शिंदे गावचे ज्येष्ठ शेतकरी जेजेराम (आप्पा) टेमगिरे यांचा दशक्रिया विधी उद्या ; शेती आणि समाजकार्यातील योगदान कायम स्मरणात

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील शिंदे गावचे ज्येष्ठ शेतकरी, कष्टाळू व्यक्तिमत्त्व आणि समाजहिताची जाणीव जपणारे जेजेराम (आप्पा) चेंडीराम टेमगिरे (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने शिंदे गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेती आणि गावाच्या विकासासाठी आयुष्यभर झटलेल्या एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला गावाने मुकल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

त्यांच्यावर शिंदे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना अखेरचा निरोप दिला.

 

खडकाळ माळरान सुपीक बागायतीत बदलले

जेजेराम (आप्पा) टेमगिरे यांनी अथक परिश्रमातून खडकाळ माळरान शेतीयोग्य बनवले. जाधववाडी धरणातून स्वतंत्र पाणी योजना उभारून त्यांनी आपल्या शेताला पाणी उपलब्ध करून दिले आणि बागायती शेतीचा आदर्श निर्माण केला. त्यामुळे परिसरात त्यांची ओळख प्रगतशील आणि हाडाचे शेतकरी म्हणून होती.

 

शेतीसोबत दुग्धव्यवसायालाही दिली चालना

आयुष्यभर शेतीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आप्पांनी ऊस, कांदा, बटाटा, सोयाबीन आणि भूईमूग यांसारखी नगदी पिके घेतली. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी उत्कृष्ट दुग्धव्यवसाय उभारून अनेकांसमोर आदर्श निर्माण केला.

 

गावाच्या प्रश्नांसाठी कायम पुढे

शिंदे गावाच्या हितासाठी झालेल्या डाऊ केमिकल आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. गावाच्या प्रश्नांवर नेहमी ठाम भूमिका घेणारे आप्पा हे ग्रामस्थांसाठी आधारवड होते. परिसरात औद्योगिकीकरण वाढल्यानंतर इंडस्ट्रियल गोडाऊन उभारणीच्या कामात त्यांनी आपल्या मुलांसह आणि नातवांना मार्गदर्शन करत मोलाची साथ दिली.

 

मोठा परिवार त्यांच्या पश्चात

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, जावई, सुना, पुतणे, भाचे, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे. शिंदे गावचे उद्योजक भगवान टेमगिरे यांचे ते वडील, तर राजेश टेमगिरे आणि प्रथमेश टेमगिरे यांचे ते आजोबा होते.

 

दशक्रिया विधी उद्या

जेजेराम (आप्पा) टेमगिरे यांचा दशक्रिया विधी मंगळवार, सकाळी ८ वाजता, वैकुंठभूमी, शिंदेगाव (ता. खेड, जि. पुणे) येथे होणार असल्याची माहिती टेमगिरे परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.