Gram Panchayat elections : ग्रामपंचायत निवडणुका पावसाळ्यानंतरच ; आरक्षणाच्या पेचामुळे ग्रामीण राजकारणाचा रणसंग्राम लांबणीवर

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित सुनावणी यामुळे ही निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता ?

Gram Panchayat elections : ग्रामपंचायत निवडणुका पावसाळ्यानंतरच ; आरक्षणाच्या पेचामुळे ग्रामीण राजकारणाचा रणसंग्राम लांबणीवर

 

महावार्ता लाईव्ह | राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता पावसाळ्यानंतरच पार पडण्याची चिन्हे आहेत. प्रभाग रचना, आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित सुनावणी यामुळे ही निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता असून, ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता पावसाळ्यानंतरच वेग येणार आहे. 

 

प्रशासकीय स्तरावर प्रभाग रचनेचे काम ४ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असले, तरी अनेक जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची एकूण टक्केवारी ५० टक्क्यांच्या वर गेल्याचे समोर आले आहे. आरक्षणाच्या या मर्यादेबाबतचा पेच सध्या सर्वोच्च न्यायालयात असून, त्यावर जुलै महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

 

न्यायालयाच्या या निर्णयावरच निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असल्याने राज्य निवडणूक आयोग आणि प्रशासन सध्या सावध भूमिका घेत आहे. जुलैमध्ये न्यायालयाचा निकाल आल्यास, ऐन पावसाळ्यात दुर्गम भागातील रस्त्यांची स्थिती आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेता निवडणुका घेणे व्यवहार्य ठरणार नाही. त्यातच, मागासवर्गीय संवर्गाची २७ टक्के आरक्षण मर्यादा आणि सरपंचांच्या आरक्षणावरून अनेक ठिकाणी प्रभाग रचना नव्याने करावी लागण्याची शक्यता आहे.