Curious to see what Mohite Patil will say | पीडीसीसी बँकेच्या शताब्दी महोत्सवात मोहिते पाटील काय बोलणार? तालुक्याचे लक्ष कार्यक्रमाकडे
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती; दिलीप मोहिते पाटील यांच्या भाषणाकडे तालुक्याचे लक्ष
महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) खेड (राजगुरुनगर) शाखेने शताब्दी वर्षात पदार्पण केल्याने शाखेचा शताब्दी महोत्सव आणि भव्य शेतकरी मेळावा गुरुवार, १८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान खेडचे माजी आमदार तथा पीडीसीसी बँकेचे संचालक दिलीप मोहिते पाटील भूषविणार आहेत.
कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील राज्याच्या धोरणांवर मंत्री बाबासाहेब पाटील मार्गदर्शन करणार असले तरी तालुक्यातील विविध प्रश्न, विकासकामे आणि अलीकडच्या काळात चर्चेत असलेल्या ताज्या विषयांवर दिलीप मोहिते पाटील नेमकी कोणती भूमिका मांडणार,काय बोलणार याकडे तालुक्याचे जनतेचे विशेष लक्ष लागले आहे.
जाहिरात

१०० वर्षांची गौरवशाली वाटचाल
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना ४ सप्टेंबर १९१७ रोजी झाली. त्यानंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत शाखांचे जाळे विस्तारले. खेड तालुक्यात बँकेची पहिली शाखा १० मे १९२६ रोजी सुरू झाली. या शाखेने शंभर वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केल्याने २०२६ मध्ये शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोहिते पाटील यांच्या कार्यकाळात विस्ताराला गती
दिलीप मोहिते पाटील सलग दहा वर्षे बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात तालुक्यात अनेक नवीन शाखा सुरू करण्यात आल्या. तसेच शाखांसाठी सुसज्ज इमारती उभारून बँकिंग सेवा अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यात आली आहे. याचबरोबर विकास सेवा सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. अनेक सोसायट्यांना नवीन इमारती मिळाल्या असून कर्जपुरवठा प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध होत असून बँकेबद्दलचा विश्वास त्यांचा अधिक दृढ झाला आहे.
शेतकरी आणि तरुणांसाठी विविध उपक्रम
शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील तरुणांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी बँकेमार्फत विविध कर्ज योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत. अनेक भूमिपुत्रांना बँकेत रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने त्यांच्या कुटुंबांनाही आर्थिक स्थैर्य लाभले आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय
शताब्दी महोत्सव आणि शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राज्यातील सहकार धोरणाबाबत भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न, विकासकामे आणि अलीकडील घडामोडींवर दिलीप मोहिते पाटील काय भाष्य करणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.१८) रोजी होणारा हा शताब्दी महोत्सव केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित न राहता तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींसाठीही महत्त्वाचा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.