Khed | ' जिल्हा परिषद चषक ' क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ; आजपासून थरार रंगणार
भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील मित्र मंडळाकडून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
Cricket Match Ambethan
महावार्ता लाईव्ह | ग्रामीण भागातील क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने व इंडियन प्रीमियर लिगच्या धर्तीवर ऑक्शन पद्धतीने आयोजित केलेल्या " जिल्हा परिषद चषक " क्रिकेट स्पर्धा २ ते ८ फेब्रुवारी या दरम्यान आंबेठाण (ता.खेड) येथील स्व.शरद जोशी स्टेडीयमच्या मैदानावर होत आहेत.
पाईट - पिंपरी जिल्हा परिषद गटातील ४१ गावातील २३० खेळाडूंनी क्रिकेट स्पर्धेसाठी सहभाग घेतला आहे.स्पर्धेतील सर्व खेळाडूंचा एक वर्षाचा विमा काढण्यात आला आहे.या स्पर्धेत हुतात्मा राजगुरू स्पोर्ट्स, शिवनेरी योद्धा इलेव्हन, तोरणा मास्टर ब्लास्टर, चक्रेश्वर नाईट रायडर्स, पन्हाळा टायटन्स, राजगड योद्धा इलेव्हन, भीमाशंकर सुपरजायन्ट, सिहंगड टायगर्स, प्रतापगड रायझिंग स्टार, राजगड चॅम्पियन, भामचंद्र वॉरियर्स, शिवनेरी योद्धा हे १२ संघ सहभागी आहेत. प्रत्येक संघातील अनेक खेळाडू हे नामांकित असून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी झालेल्या क्रिकेट स्पर्धेत खेळलेले आहेत. प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा सहभाग आहे.खेड तालुक्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि इंडियन प्रीमियर लीगचे नियम पाळून या क्रिकेट स्पर्धा होत आहेत.
क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांक बक्षीस ७५ हजार रुपये व चषक,द्वितीय क्रमांक बक्षीस ५५ हजार रुपये व चषक,तृतीय क्रमांक बक्षिस ३५ हजार व चषक,चतुर्थ क्रमांक बक्षिस ३५ हजार व चषक तसेच मॅन ऑफ द सिरीजसाठी - दुचाकी स्प्लेंडर गाडी,प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅचसाठी सन्मानचिन्ह, खेळाडूंकरिता ब्रँडेड कलर ड्रेस,मेडीकल स्पोर्ट्स,फ्रुट किट आणि टेनिस बॉलवरील स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी यु-ट्युब लाईव्ह प्रक्षेपन दाखविण्यात येणार असल्याने खेळाडूंना देखील स्पर्धेत प्रसिद्ध होण्याची संधी मिळणार आहे.
याप्रमाणे “जिल्हा परिषद चषक" २०२५ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शरद बुट्टे पाटील मित्र मंडळाचे विश्वास बुट्टे पाटील, किरण नवले, अजित शिवेकर, सोमनाथ कारले, राहुल पानसरे, अरुण चोरघे, समीर ठोंबरे, बंटी मांडेकर, सुमित सुतार, प्रवीण करपे यांनी केले आहे. संघ मालक व विविध गावचे सरपंच यांचे उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ रविवारी (दि.२) रोजी होईल. क्रिकेट शौकीन नागरिकांसह या भागातील खेळाडूंना आंबेठाण येथील मैदानावर होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे.
