Khed Accident | जैदवाडी येथे भीषण अपघात; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

राजगुरूनगरकडे जाताना काळाचा घाला; अनिकेत वाघ यांचा दुर्दैवी मृत्यू ; निष्काळजी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

Khed Accident | जैदवाडी येथे भीषण अपघात; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील जैदवाडी गावाच्या हद्दीत नाशिक-पुणे महामार्गावर गुरुवारी (दि. ११ जून) सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात टाटा सफारी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत एकनाथ वाघ (वय २७, रा. रांजणी, ता. खेड) व त्याचा मित्र धनेश बबन जाधव (वय २८, रा. जाधववाडी, ता. आंबेगाव) हे मोटारसायकल (एमएच १४ जीजी २००६) वरून राजगुरूनगरच्या दिशेने जात होते. गुरुवारी सकाळी सुमारे ६.३५ वाजण्याच्या सुमारास जैदवाडी गावच्या हद्दीत नाशिक-पुणे महामार्गावर त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून येणाऱ्या टाटा सफारी (एमएच १४ जेयू ५४५५) या वाहनाने जोरदार धडक दिली.


या अपघातात अनिकेत वाघ यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला, तर धनेश जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बंडेश ज्ञानेश्वर वाघ (वय ५०, रा. रांजणी, ता. आंबेगाव) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, टाटा सफारी चालक अजितकुमार विनोदकुमार बाजपेयी (रा. बो-हाडेवाडी, मोशी, ता. हवेली, जि. पुणे) याने वाहन भरधाव वेगाने, हयगयीने व अविचाराने चालवत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.