Crime News | चांडोली टोलनाक्याजवळ महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावले

पुणे-नाशिक महामार्गावर दुपारी घडली घटना; आरोपी दुचाकीवरून पळून गेले

Crime News | चांडोली टोलनाक्याजवळ महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावले

 

महावार्ता लाईव्ह | पुणे-नाशिक महामार्गावरील चांडोली (ता. खेड) येथील टोलनाक्याजवळ गुरुवारी दुपारी दोन अज्ञात इसमांनी एका महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले. ही घटना कांदा-लसूण केंद्रासमोरील सर्व्हिस रोडवर घडली.

 

फिर्यादी ज्योती राजकुमार उबाळे (५२, गृहिणी, रा. चांडोली टोलनाका) या आपल्या मैत्रीण कांचन ओव्हाळ यांच्यासोबत राजगुरुनगर येथून बाजार करून स्कूटीवर चांडोलीकडे परतत होत्या. त्यावेळी मागून लाल रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवर (क्रमांक माहित नाही) दोन इसम आले.

 

गाडी चालवणारा इसम अंगाने मजबूत, काळासावळा, निळसर रंगाचा शर्ट आणि काळी पँट घातलेला होता. तर मागे बसलेला इसम सावळ्या रंगाचा, पांढऱ्या पट्ट्यांचा टी-शर्ट आणि काळी पँट घातलेला होता. जेव्हा ते स्कूटीच्या शेजारी पुढे गेले, तेव्हा मागे बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने धरून हिसका मारून तोडून घेतले. हे गंठण अडीच तोळे वजनाचे आणि सुमारे दीड लाख रुपयांच्या किंमतीचे होते. हिसकावणीनंतर दोघेही आरोपी पुणेच्या दिशेने पळून गेले.

 

खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. स्थानिक नागरिकांनी अशा घटनांमध्ये सावध राहून एकटे फिरताना काळजी घ्यावी आणि संशयास्पद व्यक्ती किंवा वाहनांची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी केले आहे