Khed police take major action against criminals | खेड पोलिसांची सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई; १३ जण तडीपार, एमपीडीए अंतर्गत दोघांना एक वर्षासाठी स्थानबद्ध

दहशत माजवणाऱ्यांची गय नाही; आणखी तडीपार व एमपीडीए प्रस्ताव प्रक्रियेत ; "पुणे जिल्ह्यातून १३ सराईत गुन्हेगार तडीपार; एमपीडीए अंतर्गत दोघांना एक वर्षासाठी स्थानबद्ध, दहशत माजवणाऱ्यांना पोलिसांचा कडक इशारा."

Khed police take major action against criminals | खेड पोलिसांची सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई; १३ जण तडीपार, एमपीडीए अंतर्गत दोघांना एक वर्षासाठी स्थानबद्ध

 

महावार्ता लाईव्ह : ५ ऑगस्ट | खेड पोलीस ठाण्याने सराईत गुन्हेगारांविरोधात मोठी कारवाई करत एकूण १३ गुन्हेगारांना तडीपार करण्यात यश मिळविले आहे. याशिवाय एमपीडीए (महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा) अंतर्गत दोन धोकादायक गुन्हेगारांना एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले असून, परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणखी कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

खेड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील १२ सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आले होते. त्यानुसार मनोज माणिक हजारे, निखील नवनाथ गोगावले, राकेश पांडुरंग हजारे, गणेश दत्तात्रय गावडे, गौरव राम हजारे (सर्व रा. कनेरसर, ता. खेड), तसेच रोहन उर्फ जग्गू अशोक शिंदे, सोमनाथ कुंडलिक शिंदे, दीपक दत्तात्रय सावंत, सोमनाथ उर्फ वाळके दत्तात्रय सावंत, अनिल विश्वनाथ सावंत, महेश दत्तात्रय हांडे आणि नवनाथ नामदेव गिऱ्हे (सर्व रा. आंबोली, ता. खेड) या १२ जणांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

 

याशिवाय राजेंद्र उर्फ राजू गेणभाऊ करंडे (रा. करंडेवस्ती, राजगुरूनगर, ता. खेड) याच्याविरोधातील प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, खेड यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार त्याला पुणे, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यांच्या हद्दीबाहेर तडीपार करण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण १३ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच आणखी काही सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

दरम्यान, एमपीडीए कायद्यांतर्गत प्रविण उर्फ डॉलर सिताराम ओव्हाळ (रा. वाळद, ता. खेड) आणि संकेत सुनिल होले (रा. राक्षेवाडी, ता. खेड) या दोन धोकादायक गुन्हेगारांना नागपूर व अकोला कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. याशिवाय आणखी काही गुन्हेगारांविरोधात एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

 

खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करून नागरिकांना त्रास देणाऱ्या, भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आणि वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नसून, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश गरड, पोलीस उपनिरीक्षक पुनाजी जाधव, सहाय्यक पोलीस फौजदार शंकर भवारी, पोलीस हवालदार अमोल चासकर, विजय शेळके, मुकुंद कुडेकर, भिमा लांडे तसेच पोलीस अंमलदार स्वप्नील लोहार, गोकुळ कोळी, रमेश दाते आणि सोमनाथ गव्हाणे यांच्या पथकाने पार पाडली.