Gram panchayat election | ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल आणखी लांबणीवर?; राज्यातील १५,६३६ ग्रामपंचायतींसाठी २०२७ पर्यंत प्रतीक्षेची शक्यता

प्रभाग आरक्षण प्रक्रिया पूर्ण; मात्र विशेष सखोल मतदारयादी पुनरीक्षण (SIR) मुळे निवडणूक कार्यक्रम रखडण्याची चिन्हे

Gram panchayat election | ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल आणखी लांबणीवर?; राज्यातील १५,६३६ ग्रामपंचायतींसाठी २०२७ पर्यंत प्रतीक्षेची शक्यता

 

महावार्ता लाईव्ह | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांसह ग्रामीण भागातील राजकीय वातावरणाला तूर्तास ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील वर्ष २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये मुदत संपलेल्या तब्बल १५ हजार ६३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षात (२०२७) जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष सखोल मतदारयादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेमुळे हा पेच निर्माण झाला असून, त्यामुळे निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

 

राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. प्रभाग आरक्षण अंतिम करण्यात आले असून ते अधिकृतपणे प्रसिद्ध होणार आहे. साधारणपणे आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदारयाद्या आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो. मात्र यंदा सुरू असलेल्या विशेष सखोल मतदारयादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया विलंबाच्या छायेत आली आहे.

 

नव्या मतदारयादीवर भर

एसआयआर प्रक्रियेत मतदारयादीतील मृत, स्थलांतरित तसेच अपात्र मतदारांची नावे वगळण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी याच नव्या मतदारयादीच्या आधारे ग्रामपंचायत निवडणुका घ्याव्यात, अशी भूमिका अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगासमोर मांडल्याचे सांगितले जात आहे.

 

ऑक्टोबरनंतरही प्रक्रिया बाकी

अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्यासाठी आणखी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिना उजाडण्याची शक्यता असून, त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे व्यवहार्य ठरणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

 

इच्छुकांच्या आशांवर पाणी

गेल्या काही महिन्यांपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या इच्छुक उमेदवारांना या घडामोडीमुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी प्रचाराची तयारी, स्थानिक राजकीय हालचाली आणि गटबाजीला वेग आला होता. मात्र निवडणूक पुढे ढकलली गेल्यास या सर्व घडामोडींना काही काळासाठी ब्रेक लागणार आहे.

 

२०२७ मध्येच निवडणुकीचा बिगुल?

सध्याची मतदारयादी पुनरीक्षण प्रक्रिया, त्यानंतरची प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्यासाठी लागणारा कालावधी आणि प्रशासकीय प्रक्रिया लक्षात घेता, राज्यातील १५,६३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका थेट २०२७ मध्ये होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अंतिम निर्णय राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर होणाऱ्या अधिकृत निवडणूक कार्यक्रमानंतरच स्पष्ट होणार आहे.