Khed | पुण्यात २२ बळींची घटना ताजी असतानाच खेड तालुक्यात विषारी दारूने घेतला जीव ; धामणे येथे विषारी गावठी दारूचा बळी

दारू अड्ड्याची वारंवार माहिती देऊनही कारवाई नाही; शवविच्छेदन न केल्याने संशय अधिक गडद, दोषींवर कारवाईची मागणी

Khed | पुण्यात २२ बळींची घटना ताजी असतानाच खेड तालुक्यात विषारी दारूने घेतला जीव ; धामणे येथे विषारी गावठी दारूचा बळी

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील धामणे येथे बनावट विषारी गावठी दारू पिल्याने गावातील बापू मारुती चव्हाण (वय ५५) यांचा मंगळवारी (दि.९) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात बनावट विषारी दारूमुळे सुमारे २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच खेड तालुक्यात घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

पूर्वीही अनेकांचे बळी गेल्याचा ग्रामस्थांचा दावा

धामणे गावात अनेक वर्षांपासून गावठी दारूचा अड्डा सुरू असून यापूर्वीही पाच ते सहा जणांचा गावठी दारू पिऊन मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तरीदेखील संबंधित यंत्रणांनी या अड्ड्यावर प्रभावी कारवाई न केल्याने बेकायदेशीर व्यवसाय सुरूच असल्याचा आरोप केला जात आहे.

 

गावठी दारूच्या अड्ड्याची पोलिसांना माहिती?

धामणे गावातून आसखेड बुद्रुककडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये अनेक वर्षांपासून गावठी दारू विक्रीचा अड्डा सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या अड्ड्याबाबत अनेक वेळा पोलिसांना माहिती देण्यात आली होती. मात्र ठोस कारवाई झाली नसल्याने अड्डा सुरूच राहिला आणि अखेर एका व्यक्तीचा जीव गेला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 

 

उपचारासाठी नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले

मंगळवारी बापू चव्हाण यांनी संबंधित अड्ड्यावरून गावठी दारू प्यायल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. दारू पिल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

 

शवविच्छेदन न केल्याने निर्माण झाला संशय

त्यानंतर चव्हाण यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची खातरजमा करण्यासाठी त्यांचा मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मात्र तेथे शवविच्छेदन न करता मृतदेह परत घरी पाठविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 

"जर शवविच्छेदन झाले असते आणि विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असते, तर संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता होती," असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे शवविच्छेदन न करण्यामागील कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

घटनास्थळी पोलिसांची धाव, मात्र पुरावे गायब

मृत्यूची माहिती मिळताच एमआयडीसी उत्तर पोलीस स्टेशन महाळुंगे (सावरदरी) अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र तेथे दारूचे कॅन, फुगे किंवा अन्य साहित्य आढळून आले नाही. दारू अड्डा चालविणाऱ्यांनी मृत्यूची माहिती मिळताच पुरावे हटविल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 

हप्तेखोरीमुळे कारवाई होत नसल्याचा आरोप

उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांना नियमित हप्ते दिले जात असल्याने अनेक ठिकाणी बनावट गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याचा गंभीर आरोप धामणे ग्रामस्थ आणि युवकांनी केला आहे. वरिष्ठांना दाखवण्यासाठी किरकोळ कारवाया करून संबंधितांना नोटीस देऊन सोडून दिले जाते, त्यामुळे दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये कोणतीही भीती राहिलेली नाही, असेही ग्रामस्थांनी सांगितले.

 

 

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

 

धामणे येथील बापू चव्हाण यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून विषारी दारूमुळे मृत्यू झाला का याचा तपास करावा, संबंधित दारू अड्डा चालकांवर कठोर कारवाई करावी तसेच या भागातील बेकायदेशीर दारू व्यवसायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.