Zp election politics | खेड तालुक्यात पैशाचा महापूर; निवडणुकीत 'लक्ष्मी दर्शन'चा प्रभाव

खेड तालुक्यातील जनतेची अपेक्षा: पैशाच्या महापुरातून खरा विकास होईल का? ; मतदानाची टक्केवारी वाढली, पण उमेदवार निराश लक्ष्मी दर्शनाला साथ,नेत्यांच्या भाषणाला पाठ

Zp election politics | खेड तालुक्यात पैशाचा महापूर; निवडणुकीत 'लक्ष्मी दर्शन'चा प्रभाव

 

महावार्ता लाईव्ह | नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनी खेड तालुक्याचे  राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.निवडून आलेल्या विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला,तर पराभूत उमेदवारांना नैराश्य आले. काही नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांनी तातडीने विकासकामांना सुरुवात केली.मात्र,दुसरीकडे पंचायत समितीचे काही सदस्य राजकीय सहलींवर गेले आहेत. निवडणुकीनंतर होत असलेल्या राजकीय घडामोडींनी तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे.विशेष म्हणजे झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढली;पण त्यामागे खरी वस्तुस्थिती म्हणजे पैशाचा प्रभाव असल्याची चर्चा जोरात आहे.उमेदवारांकडून  झालेल्या प्रचंड खर्चामुळे काहींनी तर चक्क  राजकारणापासून दूर राहण्याची भाषाच केली आहे.

 

मतदान वाढीचे प्रमुख कारण काय?

खेड तालुक्यातील या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणुकांच्या तुलनेत सरासरी १०-१५ टक्क्यांनी वाढली आहे.काही गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांसारखे 'कट टू कट' मतदान झाले,ज्यात मतदारांची एकजूट आणि उत्साह दिसून आला.मात्र,या मतदान वाढीमागे 'मतदारांना लक्ष्मी दर्शन' झाल्याचा अर्थात पैशाच्या वाटपाचा प्रभाव असल्याच्या कुजबुजी आता तालुक्यात सर्वत्र सुरू आहेत.गावोगावचे स्थानिक नागरिक आणि राजकीय जाणकार निरीक्षकांच्या मते,उमेदवारांनी मतदारांना आर्थिक प्रलोभने दाखवल्यामुळे मतदान केंद्रांवर गर्दी दिसल्याचे हेच प्रमुख कारण आहे. "मतदान टक्केवारी वाढणे ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट ,पण त्यामागे खरे कारण काय,हे तर सर्वांना माहीतच आहे," असे अनेक गावचे स्थानिक कार्यकर्ते नाव न सांगण्याच्या अटीवर निवडणुकीतील घडलेल्या गमती जमती अक्षरशः पोटधरून हसून हसून सांगत आहेत.

 

निवडणुकीतील खर्चाचे काय

खेड तालुक्यातील जि.प.आणि पं.स.निवडणुकीच्या खर्चाबाबत बोलायचे तर,खेड तालुक्यात एकूण १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाली झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.जिल्हा परिषद उमेदवारांनी सरासरी ७ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्याचे बोलले जात आहे.काही नवख्या उमेदवारांचा झालेल्या खर्चाचा आकडा ऐकला तर या खर्चात विधानसभा निघाली असती असेही बोलले जात आहे.दुसरीकडे पंचायत समिती सदस्यांसाठी २ ते ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च झाली असल्याचे विजयी आणि पराभूत उमेदवार देखील खासगीत बोलताना सांगत आहेत.एमआयडीसी क्षेत्रातील पंचायत समितीचे काही मोजक्या उमेदवारांचा खर्च जिल्हा परिषद उमेदवार यांच्या एवढा झाल्याचे मान्य करीत आहेत.
       

आता निवडणुकीला "रामराम" 

"निवडणूक लढवणे म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वत:ला कंगाल करणे," असे एका पराभूत उमेदवाराने आपले मत परखडपणे व्यक्त केले.निवडणुकीनंतर काही उमेदवारांनी तर आता राजकारणाला चक्क 'राम राम' करण्याची म्हणजे राजकारण सोडण्याची भाषा केली आहे.निवडणुकीत झालेल्या या प्रचंड खर्चामुळे उमेदवारांच्या कुटुंबीयांवरही प्रचंड ताण आला असून, भविष्यातील निवडणुक त्यांच्याकडून लढविण्याबाबत  साशंकता निर्माण झाली आहे.

 

" राजकारण लय वंगाळ "

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झालेल्या जाहीर कार्यक्रमात एका जुन्या विधानाची आठवण काढली जात आहे.ती म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी अजितदादा खेड तालुक्यातील वराळे गावात आले होते.या सभेत अजित पवारांनी "राजकारण लय वंगाळ" (राजकारण खूप बेकार झाले  म्हणजे निवडणुकीत लोक केलेला विकास पाहत नाहीत) असे म्हटले होते.या शब्दांची आठवण काढत काही उमेदवारांनी राजकारणापासून 'चार हात लांब' राहण्याची भूमिका घेतली आहे."अजितदादांच्या शब्दांप्रमाणे राजकारण आता पैशाचा खेळ झाला आहे.सामान्य माणूस यात टिकू शकत नाही," असे एका उमेदवाराने निवडणूक झाल्यानंतर सांगितले.

 

विजयी उमेदवार लागले कामाला

निवडणुक झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या वर्तनात जबाबदारीचे भान या दृष्टिकोनातून कमालीचा फरक जाणवत आहे.जिल्हा परिषदेचे काही सदस्य तातडीने आपल्या मतदारसंघात फिरून विकासकामांची पाहणी करून समस्या जाणून घेताना दिसत आहेत.यामध्ये  रस्ते,पाणीपुरवठा,कचरा,दर्जेदार शिक्षण व सुविधा, विद्युत पुरवठा,रोजगार,आरोग्य सुविधा यासारख्या मुद्द्यांवर ते लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे पंचायत समितीचे सदस्य राजकीय सहलीवर गेलेले असून,पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर  नेत्यांच्या भेटीगाठी आणि पुढील रणनीतीबाबत गुप्तपणे चर्चा सुरू आहेत.पंचायत समितीवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकला पाहिजे.यासाठी तालुक्याचे आजी माजी लोकप्रतिनिधी कामाला लागले आहेत. पंचायत समितीवर कोणाची सत्ता येणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

 

निवडणूक आयोगाने नियम पायदळी

एकंदरीत,खेड तालुक्यातील जिल्हा परीषद व पंचायत समितीची ही निवडणूक राजकारणातील पैशाच्या वाढत्या प्रभावाचे उदाहरण ठरली आहे.निवडणूक आयोगाचे खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम असले तरी, प्रत्यक्षात ते पाळले जात नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.भविष्यातील निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणांची नितांत गरज असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.तालुक्यातील जनता आता नवनिर्वाचित सदस्यांकडून विकासाची अपेक्षा करीत आहे.पण चक्क पैशाच्या या महापुरातून झालेल्या निवडणुका पाहता त्यांच्याकडून  खरे बदल होतील का ? हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

   

मतदारांवर "पैशाचा प्रभाव' नेत्याचा 'नव्हे बरं का' 

खेड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक मातब्बर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.अशा उमेदवारांना हेरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) तसेच उबाठा शिवसेना व शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती.परंतु निवडणुकीत खरा सामना राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे शिवसेना यांच्यातच झाला.राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे शिवसेनेचे उमेदवार हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने त्यांनी मतदारांना लक्ष्मी दर्शन घडवून आपला विजय निश्चित केला.निवडणुकीच्या प्रचारात तालुक्याचे आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडून घसा कोरडा पडेपर्यंत विकासकामांचे गुणगान गायले.पण त्यांचा प्रभाव मतदारांवर फिका पडला.मतदारांनी लक्ष्मी दर्शनला साथ आणि नेत्यांच्या भाषणाकडे पाठ म्हणजेच मतदारांनी त्यांची सभेतली भाषणे फक्त ऐकली पण लक्ष्मी दर्शन घडविलेल्या उमेदवारांना आपली मते बहाल केली हे तेवढेच खरे आहे म्हणावे लागेल.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य झालेले पाच पैकी दोन उमेदवार अर्थात तालुक्याच्या पूर्वेकडील एक आणि अलंकापुरी परीसरातील एक हे दोन तर थेट विधानसभा हे पुढील मिशन डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली असल्याचे बोलले जात आहे.पाहूया आता खेड तालुक्यातील राजकारण काय वळण घेणार आणि नवनवीन राजकीय समीकरणाची जुळणी कशी जुळणार हे भविष्यात स्पष्ट होणार आहे.