Ncp pune | भाजपचे शरद बुट्टे पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित ? ; ११ वर्षानंतर पुन्हा स्वगृही..
शरद बुट्टे पाटलांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घेतली भेट
महावार्ता लाईव्ह | जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर,खेड तालुक्यातील ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य,भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल रात्री पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांची भेट घेतली.यामुळे बुट्टे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला असून ११ वर्षानंतर ते स्वगृही परतले आहेत.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कालच्या नियोजित दौऱ्यात संध्याकाळी उशिरा वराळे येथे शरद बुट्टे पाटील यांच्या निवासस्थानी भेट दाखवण्यात आली होती.परंतु अचानक ही भेट रद्द झालेनंतर पवार यांनी शरद बुट्टे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना आपल्या पुणे येथील जिजाई निवासस्थानी बोलावून घेतले होते.
भामा खोऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बहुतेक विकास कामांना निधी मिळाला आणि आताही मिळतो आहे.परंतु राज्याच्या अर्थसंकल्पातून स्थानिक आमदार विरोधी पक्षाचा असल्याने निधी न मिळाल्याने खेड तालुक्यातील अनेक महत्त्वांच्या रस्त्याची कामे रखडली आहेत.ती मार्गी लागावीत अशी मागणी बुट्टे पाटील यांनी भेटी दरम्यान पवार यांच्याकडे केली.
चाकण - करंजविहिरे - वांद्रा आणि शिरोली - पाईट- वांद्रा या मुख्य रस्त्यांसह कडूस किवळे कोरेगाव आणि चांदुस- कोरेगाव - कुरकुंडी- धामणे या प्रमुख जिल्हा मार्गांना तसेच श्री क्षेत्र कुंडेश्वर येथील घाट रस्त्याचे रुंदीकरणासाठी, राज्याच्या अर्थसंकल्पातून मोठा निधी मिळावा अशी मागणी बुट्टे पाटील समर्थकांनी यावेळी त्यांचेकडे केली.
त्याचबरोबर भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी निवडणुकीनंतर बैठक आयोजित करावी, दुर्गेश्वर लेणी गडद आणि येसूबाई मंदिर कोळीये यांना 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा.आंबेठाण येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे यासह जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातून मार्चमध्ये विविध विकास कामांना निधी मिळावा अशी मागणी बुट्टे पाटील यांनी केली.
बुट्टे पाटील व त्यांच्या समर्थकांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले मी काम करणारा असून विकास कामांना निधी देण्याचे अधिकार पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आहेत.अर्थमंत्री म्हणून राज्याच्या बजेट मधून देखील निधी देण्याचे काम माझ्याकडून होईल असे यावेळी शिष्ट मंडळाला पवार यांनी आश्वासित केल्याचे समजते आहे.
यावेळी शरद बुट्टे पाटील यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आणि पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार सुनीता बुट्टे पाटील, माजी सभापती चांगदेव शिवेकर, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ टेमगिरे, स्मार्ट व्हिलेज आंबेठाणचे सरपंच दत्तात्रय मांडेकर व त्यांच्या पत्नी आंबेठाण पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार श्रद्धा मांडेकर, उद्योजक संदीपशेठ भोकसे व त्यांच्या पत्नी पाईट पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार धनश्री भोकसे यांच्यासह विविध गावचे सरपंच चेअरमन प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
----
शरद बुट्टे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून येणारी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी.त्यांच्यासारखा अनुभवी आणि पंचायतराज क्षेत्रामध्ये अभ्यास असलेला आणि जनाधार असलेला कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असावा यासाठी प्रयत्न सुरू असताना त्यादृष्टीने कालची भेट महत्त्वाची मानली जाते.
------
शरद बुट्टे पाटील ११ वर्षानंतर पुन्हा स्वगृही ?
१९९९ मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून अजितदादा पवार यांच्याशी अतिशय सलोख्याचे संबंध असणारे शरद बुट्टे पाटील यांनी पवार यांचे नेतृत्वाखाली दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्ह्याचे कृषी सभापती म्हणून काम केलेले आहे. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांना पवार यांनी कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे सभापती केले होते.
पुणे पदवीधर विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रचंड तयारी केल्यानंतर देखील संधी न मिळाल्यामुळे बुट्टे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती.पक्ष सोडताना देखील त्यांनी पवार यांचेशी प्रदीर्घ चर्चा केली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे नेते गिरीश बापट यांच्या माध्यमातून त्यांनी भाजपचे प्रवेश केला होता.
आता झालेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती गट आणि गण रचनेमध्ये देखील पवार यांनी शरद बुट्टे पाटील यांना सहकार्य केल्याची चर्चा आहे.
शरद बुट्टे पाटील भाजपाचे पदाधिकारी असले तरी विकास कामांमध्ये पवार यांनी गेले वर्षभरात त्यांना अनेक कामात सहकार्य केल्याचे दिसत होते. यातूनच बुट्टे पाटील पुन्हा पवार यांच्याकडे जातील अशा प्रकारच्या चर्चा कायम रंगत होती.
लोकसभा प्रचाराच्या निमित्ताने खेड तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर शरद बुट्टे पाटील यांच्या भाम येथील जनसंपर्क कार्यालयाला देखील पवार यांनी भेट दिली होती.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील शरद बुट्टे पाटील यांच्याशी आपले जवळचे संबंध असल्याचे जाहीर भाषणात पवार यांनी सांगितले होते.
-------
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचारामध्ये बुट्टे पाटील यांनी अनेक सभा गाजवल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आले आहेत.यातूनच आढळराव पाटील यांनी बुट्टे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेण्याच्या संदर्भामध्ये सुचित केले आहे. तर दिलीप मोहिते पाटील यांनी देखील बुट्टे पाटील यांना बरोबर घेण्यास होकार दिला असल्याचे समजते.
----
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दोन दिवसापूर्वी कोरेगाव खुर्द, शिवे,वहागाव, गडद परिसरात दौरा करताना बाहेरच्या उमेदवाराला मदत करू नका, स्थानिक काम काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे रहा असे आवाहन करून बुट्टे पाटील यांना मदत करण्याचे सूचित केले होते.
अखेर शरद बुटे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश निश्चित होत आहे.यामुळे खेड तालुक्यात राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार हे निश्चित असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याने पक्षाची ताकद देखील वाढली आहे.
