Khed crime | अल्पवयीन मुलीचा पाठलाग, लग्नासाठी दबाव; युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा

घरात घुसून शिवीगाळ, रस्त्यात मोटारसायकलने पाठलाग; पोक्सो कायद्यान्वये कारवाई; आरोपी अटक

Khed crime | अल्पवयीन मुलीचा पाठलाग, लग्नासाठी दबाव; युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा

 

महावार्ता लाईव्ह | अल्पवयीन मुलीला वारंवार फोन करून लग्नासाठी दबाव टाकणे, बदनामीची धमकी देणे, घरात घुसून शिवीगाळ व दमदाटी करणे तसेच रस्त्यात पाठलाग करून त्रास दिल्याप्रकरणी एका युवकाविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ वर्षीय तरुणीची ओळख हरिश्चंद्र उर्फ हर्षल प्रभाकर पडवळ याच्याशी झाली होती. तरुणी अल्पवयीन असतानाच आरोपीने तिच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधून लग्न करण्यासाठी आग्रह धरल्याचा आरोप आहे. मात्र, शिक्षण पूर्ण करून करिअर करण्याची इच्छा असल्याने तरुणीने सांगून त्याला लग्नास स्पष्ट नकार दिला होता.

 

तरीही आरोपीने सातत्याने फोन करून त्रास दिला. तसेच मे २०२६ मध्ये तरुणीच्या घरी जाऊन लग्नास नकार दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर पुन्हा घरात घुसून शिवीगाळ व दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

 

दरम्यान, १० जून रोजी सकाळी राजगुरूनगर बसस्थानकातून करिअर अकॅडमीकडे रस्त्याने जात असताना आरोपीने मोटार सायकलवरून पाठलाग करीत तीला रस्तात अडवले व लग्नासाठी दबाव टाकत धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने आपल्या आई-वडिलांना माहिती दिल्यानंतर खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

 

या तक्रारीवरून खेड पोलिसांनी आरोपी हरिश्चंद्र उर्फ हर्षल प्रभाकर पडवळ याच्याविरुद्ध पोक्सो कायदा तसेच संबंधित फौजदारी कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.