राजगुरूनगर बँकेत नव्या जोडीची ‘इनिंग’! अरुण थिगळे अध्यक्ष, सचिन मांजरे उपाध्यक्ष

सागर पाटोळे व रामदास धनवटे यांच्या राजीनाम्यानंतर नव्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; मुख्य शाखेतील सभागृहात पार पडली बिनविरोध निवड प्रक्रिया.

राजगुरूनगर बँकेत नव्या जोडीची ‘इनिंग’! अरुण थिगळे अध्यक्ष, सचिन मांजरे उपाध्यक्ष

 

महावार्ता लाईव्ह | उत्तर पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी अरुण थिगळे, तर उपाध्यक्षपदी सचिन किरण मांजरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेच्या मुख्य शाखेतील सभागृहात झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.

 

 

बँकेच्या अध्यक्षपदासाठी सागर पाटोळे आणि उपाध्यक्षपदासाठी रामदास धनवटे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदांचे राजीनामे दिल्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी अरुण थिगळे आणि उपाध्यक्षपदासाठी सचिन किरण मांजरे यांची एकमेव नावे आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

 

अरुण थिगळे यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने बँकेच्या आगामी कारभाराबाबत सभासदांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तर सचिन किरण मांजरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याने बँकेच्या व्यवस्थापनात नव्या नेतृत्वाची भर पडली आहे.

 

 

निवडीनंतर उपस्थित संचालकांनी नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण थिगळे आणि उपाध्यक्ष सचिन किरण मांजरे यांचे अभिनंदन केले. बँकेच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या हितासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

यावेळी ज्येष्ठ संचालक तथा माजी अध्यक्ष किरण आहेर, माजी अध्यक्ष सागर पाटोळे, अविनाश कहाणे, दिनेश ओसवाल , राजेंद्र सांडभोर, गणेश थिगळे, विजया शिंदे, राहुल तांबे, राजेंद्र वाळुंज, विनायक घुमटकर, रामदास धनवटे, दत्ता भेगडे, समीर आहेर, अश्विनी पाचारणे, विजय डोळस आदी संचालक उपस्थित होते.

 

नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली बँकेचा कारभार अधिक सक्षम करण्याबरोबरच सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी काम करण्याचे आव्हान आता नव्या पदाधिकाऱ्यांसमोर आहे. बँकेच्या आगामी वाटचालीत नव्या नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.