Special Award | पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य विशाल जाधव यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
महाराष्ट्र शासन व शैक्षणिक संस्थांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत विशाल जाधव यांचा सन्मान
महावार्ता लाईव्ह | रोहकल (ता.खेड) येथील पोदार इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य विशाल जाधव यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रशालेचे मुख्याध्यापक जाधव यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद (पुणे) आणि महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ जिल्हा शाखा (पुणे) यांच्या वतीने दिला जाणारा 'जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार' पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर आणि कालाध्यापक संघाच्या अध्यक्षा व पुणे मनपा स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार सोहळा पुणे येथील आण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडला.कला शिक्षकांसाठी आयोजित एकदिवसीय कृतिसत्राच्या कार्यशाळेत वारली चित्रकला, मधुबनी, रांगोळी, कॅलिग्राफी, क्राफ्ट, पेपर क्राफ्ट आर्ट, संगीत आदीबाबत तज्ञांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. कला विषय अभ्यासक्रमातील बदलाबाबत SCERT अभ्यास समिती सदस्य अमोल जाधव, कला विषयातील करियर सचिन कदम, पवित्र पोर्टल कलाशिक्षक भरती प्रक्रिया महेश मोरे, ग्रेड परीक्षा प्रात्यक्षिक रमेश खरबडे या सर्वांचे यावेळी मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा कलाध्यापक संघाच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका अश्विनी कदम यांनी कला विषय अभ्यासक्रमातील महत्व विशद करत विद्यार्थ्यांसाठी संघामार्फत राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. एन.ए.पी मध्ये कला विषयाला महत्त्वाचे स्थान असून कलाशिक्षकाने आवडीने, स्वतःचा अनुभवाचा वापर करून तळमळीने शिकविल्यास कला विषयाची उद्दिष्टपूर्ती व दिशा योग्य राहील.
ग्रेड परीक्षांसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून या विषयात त्यांना आवड निर्माण होत आहे.कला शिक्षकाने इतर विषय शिकल्याने ज्ञान मिळते.परंतु कलाविषय शिकल्याने सद्गुण प्राप्त होतात.असे प्रतिपादन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिरी डॉ.भाऊसाहेब कारेकर यांनी केले. यावेळी शिक्षणाधिकारी कारेकर यांनी स्वतः हातात ब्रश घेऊन अनेक प्रकारचे चित्र रेखाटले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव कदम यांनी केले.आभार गजानन लोणकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका, जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील, पाचशेहून अधिक शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते.