Khed Crime News | चांडोलीत टायर दुकानात चोरी, सव्वा लाखांचा ऐवज लंपास; DVR पळवला

दुकानाचे गज आणि कुलूप तोडून सव्वा लाखांचा डल्ला; पुरावे नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरही नेला सोबत!

Khed Crime News | चांडोलीत टायर दुकानात चोरी, सव्वा लाखांचा ऐवज लंपास; DVR पळवला

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील चांडोली येथील 'शालीमार टायर्स' या दुकानाचे कुलूप व खिडकीचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, चोरीचा कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचा 'डीव्हीआर' (DVR) देखील चोरून नेला आहे. ही घटना ११ नोव्हेंबरच्या रात्री ते १२ नोव्हेंबरच्या सकाळच्या दरम्यान घडली.

 

याप्रकरणी राजेंद्र रमेश सांडभोर ( रा. चांडोली, ता. खेड, जि. पुणे) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, चांडोली गावच्या हद्दीत राजेंद्र सांडभोर यांचे लोखंडी पत्राशेडमध्ये 'शालीमार टायर्स' नावाचे दुकान आहे. बुधवार (दि. ११) रोजी रात्री साडेसात वाजता ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या खिडकीचे लोखंडी गज तसेच दरवाजाचा कडी-कोयंडा आणि कुलूप कशाच्या तरी साहाय्याने तोडले. दुकानात प्रवेश करून चोरट्यांनी दुकानात ठेवलेली ८५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरली (ज्यामध्ये ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता).

 

या रोख रकमेसह चोरट्यांनी २६ हजार ६०० रुपये किमतीचे चारचाकी वाहनाचे ७ टायर आणि ८ हजार ४०० रुपये किमतीचे दुचाकीचे ६ टायर चोरून नेले. तसेच आपला माग लागू नये या लबाडीच्या इराद्याने त्यांनी ५ हजार रुपये किमतीचा एक डीव्हीआरही चोरून नेला. असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.

 

गुरुवारी (दि. १२) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र सांडभोर हे दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना दुकानाचे कुलूप व खिडकी तुटलेल्या अवस्थेत दिसली. आत जाऊन पाहिले असता दुकानातील रोकड आणि टायर्स चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ खेड पोलिसांत धाव घेत या चोरीची फिर्याद दिली.
खेड पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास खेड पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहे.