खेड तालुक्यात शिवसेनेचे नक्की चाललंय काय? शिंदे गटाच्या स्वागताला ठाकरे गटाचे नेते; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

खेड तालुक्यात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची विविध कार्यक्रमांतील उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. स्थानिक राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह

खेड तालुक्यात शिवसेनेचे नक्की चाललंय काय? शिंदे गटाच्या स्वागताला ठाकरे गटाचे नेते; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

 

महावार्ता लाईव्ह | राज्यात शिवसेना (शिंदेगट पक्ष) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष सर्वांना परिचित आहे.तालुक्याच्या स्थानिक पातळीवर दोन्ही शिवसेना पक्षाचे नेत्यांची विविध कार्यक्रमांतील उपस्थिती लक्ष वेधून घेत आहे.त्यामुळे आगामी काळात खेड तालुक्याच्या राजकारणाची दिशा काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

 

 

मागील महिन्यात चाकण एमआयडीसीत पाहणी दौऱ्यासाठी शिवसेना शिंदे पक्षाचे प्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते.यावेळी आमदार बाबाजी काळे यांनी संत तुकाराम महाराजांची पगडी घालून त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे, पंचायत समितीचे पदाधिकारी यासह अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या चाकण एमआयडीसी दौऱ्यावेळीही आमदार बाबाजी काळे उपस्थित होते. शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यांमध्ये स्थानिक राजकीय नेत्यांची उपस्थिती सातत्याने दिसून येत आहे.

 

 

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात आमदारांची अनुपस्थिती

याच दरम्यान चाकणच्या राजकीय घडामोडींमध्ये आणखी एक प्रसंग लक्षवेधी ठरला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे चाकण एमआयडीसी मध्ये पाहणी दौऱ्यावर आले असता त्यांच्या पक्षाचे स्थानिक आमदार बाबाजी काळे यांनी नकळत हजेरी लावून आदित्य ठाकरेंचा अर्धवट दौरा सोडून एका लग्न समारंभासाठी गेले होते. त्यावेळीही या प्रकाराची जोरदार चर्चा तालुक्यात झाली होती.

 


खेड तालुक्यात शिवसेना शिंदेगट नेत्यांच्या स्वागतासाठी शिवसेना उबाठा पक्षाचे संबंधित स्थानिक पदाधिकारी दिसतात. आदित्य ठाकरेंचा अर्धवट दौरा सोडून आमदार काळे गेल्याने त्यांची कार्यक्रमात अनुपस्थिती दिसून आली.या दोन्ही घटनांमुळे स्थानिक राजकारणातील परस्पर संबंधांकडे लक्ष वेधले गेले.

 

निलम गोऱ्हेंपासून सचिन आहिर यांच्या दौऱ्यापर्यंत

राजगुरूनगर येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या स्वागतासाठी खेड तालुक्यातील शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या विजया शिंदे उपस्थित होत्या.

 

 

त्यानंतर दि.३१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन आहिर यांच्या भीमाशंकर दौऱ्यावेळी आमदार काळे यांचे पुत्र तथा युवासेना जिल्हाप्रमुख मृण्मय काळे हे स्वागतासाठी उपस्थित राहिले. दोन्ही पक्षामध्ये राज्य पातळीवर तीव्र राजकीय संघर्ष सुरू असताना स्थानिक नेत्यांच्या अशा भेटीगाठी आणि कार्यक्रमांमधील सहभागाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे.

 

सचिन आहिर यांच्या दौऱ्यापासून मुंबईतील भेटीपर्यंत

दरम्यान, सचिन आहिर यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला रामराम केल्यानंतर शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर ते विधान परिषदेचे उपसभापती झाले. मुंबईत आहिर यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख रामदास धनवटे आणि उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे उपस्थित होते.

 

 

त्यामुळे दोन्ही पक्षामधील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या भेटीलाही विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. त्यानंतर तळेगाव दाभाडे येथे राजगुरूनगर सहकारी बँकेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सचिन आहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या कार्यक्रमाशी संबंधित अहिर यांच्या शासकीय दौऱ्याच्या प्रसिद्धीपत्रकात शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तसेच राजगुरूनगर सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष रामदास धनवटे यांचे नाव संपर्क म्हणून नमूद करण्यात आले होते.या देखील  उल्लेखामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय संबंधांबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

 

 

फडणवीस यांच्या भीमाशंकर दौऱ्यात घडामोडी

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मंदिराचे विकासकामांचा पाहणी दौरा झाला होता.त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आम्ही आमदार बाबाजी काळे यांना प्रपोजल दिले आहे.नेमके कोणते प्रपोजल दिले याबाबतची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली होती.

 

 

चाकणला शिंदेगटाच्या उमेदवार गोरेंना पाठिंबा

चाकण नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे व शिवसेना शिंदे पक्षाच्या स्थानिक राजकारणातील समीकरणाची वेगळी बाजू समोर आली होती. शिवसेना शिंदेगट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे आमदार शरद सोनावणे एकत्र उपस्थित होते.माजी आमदार स्व.सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून ठाकरे शिवसेना पक्षाने मनीषा गोरे यांना पाठिंबा दिल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. हा पाठिंबा म्हणजे युती नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.

 

 

पडद्यामागे नेमके काय?

शिवसेना (शिंदेगट) आणि शिवसेना (उबाठा पक्ष) यांच्यात  राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी असताना खेड तालुक्यात मात्र विविध कार्यक्रमांमध्ये दोन्ही बाजूंच्या नेत्यांचा सहभाग दिसून येत आहे. स्वागत, दौरे, शासकीय कार्यक्रम आणि स्थानिक संस्थांच्या कार्यक्रमांमधील या उपस्थितीमागे केवळ औपचारिकता आहे की काही स्थानिक राजकीय गणिते जुळवली जात आहेत, हाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. आगामी काळात या घडामोडींना कोणते राजकीय वळण मिळते, याकडे खेड तालुक्यातील राजकीय जाणकार कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले जाणार हे तितकेच सत्य आहे.