Pait accident | ट्रॅक्टर पलटी होऊन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; पाईट गावावर शोककळा
शेतातून ट्रॅक्टर घरी आणत असताना अपघात; माजी सरपंच वंदना डांगले व शिवसेना विभाग प्रमुख सुभाष डांगले यांचा एकुलता एक मुलगा काळाच्या पडद्याआड; गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त
महावार्ता लाईव्ह | शेतातून ट्रॅक्टर घेऊन येत असताना झालेल्या अपघातात पाईट (ता.खेड) येथील कु.अजय सुभाष डांगले (वय २७) या तरुण युवकाचा मृत्यू झाला.मंगळवारी (दि.१६) रोजी दुपारी ३-३० वाजण्याच्या दरम्यान झालेल्या या अपघाताच्या दुर्दैवी घटनेने पाईट गाव आणि परिसरात शोककळा पसरली. तर गावच्या नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाईट गावच्या माजी सरपंच वंदना डांगले व शिवसेना विभाग प्रमुख सुभाष शंकर डांगले यांचा हा एकुलता एक मुलगा होता. घराजवळील असलेल्या शेताची ट्रॅक्टरद्वारे फणनीचे काम सुरू होते. दुपारी संपूर्ण शेताची फणनी झाल्यावर शेतातून ट्रॅक्टर घरी नेत असताना अचानक ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या गंभीर अपघातात अजय डांगले या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.अपघाताची घटना तालुक्याच्या पश्चिम भागात वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.
अजयला प्राथमिक उपचारासाठी तात्काळ पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथून राजगुरूनगर जवळच्या चांडोली येथील साळुंके हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचार करून तेथून पुन्हा शासनाच्या चांडोली ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.त्यानंतर शवविच्छेदन करून अजयचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मंगळवारी (दि.१६) रात्री उशिरा पाईटच्या स्मशानभूमीत अजय या तरुणाचे मृतदेहावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंतिम अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे रामदास धनवटे, विजया शिंदे, वराळेचे माजी सरपंच विश्वास बुट्टे पाटील यासह परिसरातील अनेक गावचे व विकास सोसायटीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व गावचे नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी अनेकांनी श्रद्धांजली वाहिली.
जाहिरात -

