Chas-kadus road accident | भरधाव टँकरची धडक; रस्त्याच्या कडेला उभ्या युवकाचा जागीच मृत्यू ; चास-कडूस मार्गावर भीषण अपघात

निष्काळजी वाहनचालकामुळे बळी; टँकर चालकावर गुन्हा दाखल ; स्कुटीजवळ उभे असताना अपघात; ३४ वर्षीय राहुल ढमाले यांचा दुर्दैवी अंत

Chas-kadus road accident | भरधाव टँकरची धडक; रस्त्याच्या कडेला उभ्या युवकाचा जागीच मृत्यू ; चास-कडूस मार्गावर भीषण अपघात

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील चास-कडूस मार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका ३४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत युवकाचे नाव राहुल विलास ढमाले (रा. चास, ता. खेड, जि. पुणे) असे आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आज ( दि.१) सकाळी सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास कडूस गावाच्या हद्दीत टोकेवाडी येथील राम मंदिराजवळील वळणावर हा अपघात झाला. राहुल ढमाले हे त्यांच्या ज्युपिटर स्कुटीजवळ रस्त्याच्या कडेला उभे असताना, चासकडून कडूसकडे येणाऱ्या दुधाच्या टँकरने त्यांना जोरदार धडक दिली.

 

प्रत्यक्षदर्शी प्रदीप आप्पासाहेब जोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर राहुल हे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर बेशुद्ध पडले होते. त्यांच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली होती. घटनास्थळी त्यांची स्कुटी उभी होती, तर टँकर देखील जवळच आढळून आला.

 

स्थानिकांच्या मदतीने जखमी राहुल यांना तातडीने चांडोली येथील साळुंके हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढे ग्रामीण रुग्णालय, चांडोली येथे हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून राहुल ढमाले यांना मृत घोषित केले.

 

दरम्यान, संबंधित टँकर चालकाचे नाव शकील आबास पठाण (वय 28, रा. चांडोली, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. सोने सांगवी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे असून, त्याने टँकर भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवल्याने हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी टँकर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

परिसरात हळहळ व्यक्त

या घटनेमुळे चास परिसरात शोककळा पसरली असून, राहुल ढमाले यांच्या अकाली निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.