Pune Crime news | दीड वर्षे पोलिसांना गुंगारा, अखेर मोक्कातील दोघे जेरबंद! खेडमध्ये LCB ची धडक कारवाई

पुणे ग्रामीण पोलिसांच्या LCB पथकाची धडक कारवाई! खेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून, दंगल आणि मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यांतील दोन फरार आरोपींना दीड वर्षानंतर ठोकल्या बेड्या...

Pune Crime news | दीड वर्षे पोलिसांना गुंगारा, अखेर मोक्कातील दोघे जेरबंद! खेडमध्ये LCB ची धडक कारवाई

 

महावार्ता लाईव्ह | पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत, खेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर स्वरूपाच्या 'मोक्का' (MCOCA) गुन्ह्यातील दोन फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे दोन्ही सराईत गुन्हेगार गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर खेड सिटी एमआयडीसी परिसरात सापळा रचून त्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

 

मयूर तानाजी हजारे (रा. कनेरसर, ता. खेड, जि. पुणे) आणि गणेश दिलीप गोरडे (रा. गोसासी, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर आणि खेड पोलीस ठाण्यात खून, अपहरण, दंगल आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

खेड पोलीस ठाण्यात या दोघांवर (गु.र.नं. २६३/२०२५) भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) १९९९ च्या कडक कलमांन्वये गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोन्ही आरोपी गेली दीड वर्षे पोलिसांना चकवा देऊन फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेकडून त्यांच्या मागावर सातत्याने शोधमोहीम राबवली जात होती.

 

याचदरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका गोपनीय बातमीदारामार्फत हे आरोपी खेड सिटी एमआयडीसी (MIDC) परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने रणनीती आखून सापळा रचला आणि दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. अटकेनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना खेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.


LCB पथकाची उल्लेखनीय कामगिरी 

 पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

प्रत्यक्ष कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद बांबळे, तसेच पोलीस हवालदार संदीप फड, स्वप्नील गाढवे आणि हनुमंत ढोबळे यांनी विशेष कामगिरी बजावली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे खेड परिसरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण होणार असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.