Rajgurungar Mudar | राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना; मानेवर कोयत्याचा घाव घालून मामाचा खून ; भाच्च्याने गळफास लावून केली आत्महत्या

एकाच घरात हत्या आणि आत्महत्या; राजगुरूनगरच्या माधवनगर परिसरात खळबळ; मामाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, तर भाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत

Rajgurungar Mudar | राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना; मानेवर कोयत्याचा घाव घालून मामाचा खून ; भाच्च्याने गळफास लावून केली आत्महत्या

 

महावार्ता लाईव्ह | आजारपणात आधार मिळावा म्हणून भाच्याच्या घरी उपचारासाठी आलेल्या सख्या मामाचा भाच्याने कोयत्याने वार करून खून केला, त्यानंतर स्वतःही गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत खळबळजनक घटना खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील माधवनगर परिसरात घडली आहे. या हत्या आणि आत्महत्येच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. संदीप वामन गडदे (वय ४३) असे खून झालेल्या मामाचे नाव असून, प्रवीण कैलास कोहिणकर (वय २०) असे आत्महत्या केलेल्या भाच्याचे नाव आहे.

 

आजारपणात उपचारासाठी आला होता मामा

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संदीप गडदे हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. आजारपणावर उपचार घेता यावेत आणि काळजी घेता यावी म्हणून ते मागील सुमारे दोन महिन्यांपासून राजगुरूनगर येथील माधवनगर परिसरात राहणाऱ्या आपल्या भाच्याकडे, म्हणजेच प्रवीण कोहिणकरच्या घरी राहायला आले होते. प्रवीण आणि कुटुंबीय त्यांची देखभाल करत होते.

 

कोयत्याने गळ्यावर वार, नंतर स्वतःचा गळफास

नेहमीप्रमाणे सर्व सुरू असताना सकाळी अचानक प्रवीणने धारदार कोयत्याने संदीप यांच्या गळ्यावर जबर वार केले. हा वार अत्यंत प्राणघातक असल्याने संदीप गडदे यांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. मामाचा खून केल्यानंतर प्रवीणने स्वतःही त्याच घरात गळफास लावून आपले जीवन संपवले. एकाच घरात मामाचा रक्ताने माखलेला मृतदेह आणि भाच्याचा लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला.

 

आत्महत्येपूर्वी लिहिली 'सुसाईड नोट'

या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांच्या हाती प्रवीणने लिहिलेली एक सुसाईड नोट लागली आहे. या चिठ्ठीत त्याने "मामाच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत आहे," असा प्राथमिक उल्लेख केल्याचे समोर आले आहे. मात्र, हा त्रास नेमका कोणत्या स्वरूपाचा होता, आजारपणाच्या काही वाद सुरू होते का, की यामागे अन्य काही कौटुंबिक किंवा आर्थिक कारण होते, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. 

 

खेड पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, सुसाईड नोटसह इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन  तपासणीसाठी (शवविच्छेदन) राजगुरूनगर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. मामा-भाच्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या आणि अशा टोकाच्या वळणावर पोहोचलेल्या या घटनेमुळे राजगुरूनगर परिसरात शोककळा पसरली आहे.