Wife Murdered, Son Attacked in Rajgurunagar | राजगुरुनगर हादरले! पत्नीचा खून केल्यानंतर मुलावरही जीवघेणा हल्ला
बहिणीशी बोलत नसल्याच्या कारणातून पत्नीचा गळा आवळून खून; आईला उठवण्यासाठी गेलेल्या मुलावर जीवघेणा हल्ला
महावार्ता लाईव्ह | घरातील कौटुंबिक वादातून राजगुरुनगर शहरात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर आरोपीने आपल्या १७ वर्षीय मुलावरही जीवघेणा हल्ला केला. मुलाचा ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर घराबाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर चाकूने वार करण्यात आला.
या प्रकरणी महेंद्र शिवाजी दौंडकर (वय ४५, रा. संगम गार्डन, वाडा रोड, राजगुरुनगर ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्याच्या १७ वर्षीय मुलाने पोलिसांत तक्रार दिली आहे.
पत्नीचा गळा आवळून खून
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, रविवार, ३० ऑगस्ट रोजी रात्री ९.३० ते ११.३५ वाजण्याच्या दरम्यान वाडा रोड येथील राहत्या घरात ही घटना घडली. महेंद्र दौंडकर यांनी त्यांची पत्नी दीपा महेंद्र दौंडकर (वय ४०) यांचा गळा आवळून खून केला. पत्नी आपल्या बहिणीशी बोलत नसल्याच्या कारणातून हा प्रकार घडला.
आईला उठवण्यासाठी गेला अन्...
दरम्यान, १७ वर्षीय मुलगा आईला उठवण्यासाठी बेडरूममध्ये गेला असता त्याला आई मृतावस्थेत दिसली. हा प्रकार पाहून त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मुलाचा आरडाओरडा ऐकून आरोपीने त्याच्यावरही हल्ला केला. आरोपीने ओढणीच्या सहाय्याने मुलाचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. मुलाने प्रतिकार करत स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला.
चाकूने मुलाच्या अंगठ्यावर वार
मुलगा घराबाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने ‘तुला चाकूने घुपसेन’ अशी धमकी दिली. त्यानंतर मुलाच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर चाकूने वार केला. पत्नीच्या खुनानंतर मुलावरही चाकूने हल्ला झाल्याने या घटनेने राजगुरुनगर शहरात खळबळ उडाली आहे.
खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी मुलाने दिलेल्या तक्रारीवरून सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.