Crime news | आळंदीत पेट्रोल पंपावर चालकाला बेदम मारहाण; बेल्टने डोक्यात वार, पाच जणांवर गुन्हा

पेट्रोल पंपावर गुंडगिरी! सीएनजी भरून थांबलेल्या चालकाला बेल्टने मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल

Crime news | आळंदीत पेट्रोल पंपावर चालकाला बेदम मारहाण; बेल्टने डोक्यात वार, पाच जणांवर गुन्हा

 

महावार्ता लाईव्ह | पेट्रोल पंपावर सीएनजी भरून प्रवाशाची वाट पाहत थांबलेल्या एका चालकाला गाडी बाजूला काढण्याच्या कारणावरून पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना आळंदी शहरात घडली आहे. या हल्ल्यात एका आरोपीने कंबरेच्या पट्ट्याच्या लोखंडी बक्कलने चालकाच्या डोक्यात वार करून त्याला जखमी केले असून, झटापटीत फिर्यादीची सोन्याची बाळीही गहाळ झाली आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भगवान विनायक आंधळे (वय ३१, व्यवसाय- चालक, रा. आळंदी, मूळ रा. माळेगाव चकला, ता. शिरूर कासार, जि. बीड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विजय संजय लहाने (वय २०,  कॅब चालक, रा. दत्त मंदिरामागे, आळंदी), करण दत्ताराम ढगे (वय २३, ओला कॅब चालक, रा. भावडी चौक, आळंदी), सोन्या उर्फ जय बाबाजी दुधे (वय २०, रा. थोरवे वस्ती, वडगाव रोड, आळंदी) आणि त्यांच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास आळंदी शहरातील मरकळ रोडवरील घुंडरे पेट्रोल पंपावर घडली. फिर्यादी आंधळे हे आपल्या गाडीत सीएनजी भरून पॅसेंजर ट्रीप पडण्याची वाट पाहत बसले होते. यावेळी आरोपी करण ढगे हा त्यांच्या गाडीजवळ आला आणि त्याने पेट्रोल पंपावरून गाडी काढण्यास सांगितले. फिर्यादीने "गाडी कशासाठी काढायची?" अशी विचारणा केली असता, त्याचा राग येऊन ढगे याने फिर्यादीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच कॉलर पकडून त्यांना गाडीतून ओढून बाहेर काढले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

 

त्याच वेळी निळ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून (क्र. एम.एच. १४ एन.ई. ०१३०) ढगे याचे साथीदार विजय लहाने, सोन्या उर्फ जय दुधे आणि इतर दोन अज्ञात इसम तेथे उतरले. त्यांनीही कोणतेही कारण नसताना फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान, आरोपी विजय लहाने याने फिर्यादीला ढकलून जमिनीवर पाडले आणि स्वतःच्या कंबरेचा पट्टा काढून त्याच्या लोखंडी बक्कल असलेल्या बाजूने फिर्यादीच्या डोक्यात वार करून त्यांना जखमी केले.

 

मारहाणीनंतर आरोपींनी फिर्यादीला "परत या परिसरात गाडी घेऊन दिसलास, तर तुला सोडणार नाही," अशी धमकी दिली. या संपूर्ण मारहाणीदरम्यान फिर्यादीच्या कानातील सोन्याची बाळी गहाळ झाली आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुधमल हे करत आहेत.