Khed Koita Attack | खेडमध्ये भरदिवसा थरार! तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; ३ अज्ञातांवर गुन्हा दाखल
खेड तालुक्यातील तिन्हेवाडी रोड परिसरात २६ वर्षीय तरुणावर तीन अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने हल्ला केला. तरुण गंभीर जखमी असून खेड परिसरात खळबळ उडाली आहे.
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील तिन्हेवाडी-सांडभोरवाडी गावच्या हद्दीत भरदिवसा एका कंत्राटदार तरुणावर तीन अज्ञात इसमांनी कोयत्याने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्यात, हातांवर आणि छातीवर गंभीर वार झाले असून, सध्या त्याच्यावर राजगुरूनगर मधील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे खेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
शिवम बाळासाहेब करमारे (वय २६ वर्षे, रा. आरुडेवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ आदित्य काळुराम करमारे (वय २४ वर्षे, रा. पाचारणेवाडी, ता. खेड) याने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकी घटना काय घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि.१०) दुपारी साधारण २:४३ वाजताच्या सुमारास फिर्यादी आदित्य हा थिगळस्थळ येथे होता. त्यावेळी त्याला मित्र ऋषिकेश यांचा फोन आला. "तुझा भाऊ शिवम याच्यावर तिघा जणांनी कोयत्याने वार केले आहेत आणि तो तिन्हेवाडी रोडवरील माझ्या घरापुढील रस्त्यावर पडला आहे," अशी माहिती ऋषिकेश यांनी आदित्यला दिली.
रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भाऊ
ही माहिती मिळताच आदित्यने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्याचा भाऊ शिवम रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडलेला होता. घटनास्थळी स्थानिक नागरिक जमा झाले होते. उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत अगोदरच रुग्णवाहिका बोलावली होती. नागरिकांच्या मदतीने आदित्यने जखमी शिवमला रुग्णवाहिकेतून खेड मधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने आयसीयूमध्ये (ICU) दाखल करून उपचार सुरू आहेत.
हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट
जखमी शिवम हा कॉन्ट्रॅक्टर (कंत्राटदार) म्हणून काम करतो. १० नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास शिवम तिन्हेवाडी रोड येथे असताना, तीन अज्ञात इसमांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढवला. त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात, दोन्ही हातांवर आणि छातीच्या उजव्या बाजूस कोयत्याने सपासप वार करण्यात आले. मात्र, हा जीवघेणा हल्ला नेमक्या कोणत्या पूर्व वैमनस्यातून किंवा कारणातून झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही.
पोलिसांचा बारकाईने तपास सुरू
याप्रकरणी खेड पोलिसांनी आदित्य करमारे याच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (ASI) अभिजीत जयसिंग कुदळे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला असून, पोलीस हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत.