Khed | जैवविविधता संवर्धन जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न
राजगुरुनगर, अकोले, इगतपुरी तालुक्यातील २५० बियाणे संवर्धक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला
अमित टाकळकर
राजगुरुनगर : येथील भारत सरकारचे कांदा व लसूण संशोधन केंद्र, नवी दिल्लीतील राष्ट्रीय वनस्पती अनुवांशिक संसाधन ब्युरो व पुण्याच्या बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यातील दरकवाडी येथे गुरुवारी (दि. ७) स्थानिक जैवविविधता संवर्धन जाणीव जागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये राजगुरुनगर, अकोले, इगतपुरी तालुक्यातील २५० बियाणे संवर्धक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. कृष्णमूर्ती फाउंडेशनचे सह्याद्री स्कूल, एमकेसीएल पुणे व कल्पवृक्ष, पुणे यांच्या सहभागातून ३०० च्या वर विविध पिक वाण आणि स्थानिक जैवविविधता प्रदर्शन मांडले होते.
प्रस्तावनेत बायफ चे मुख्य तांत्रीक कार्यक्रम अधिकारी संजय पाटील यांनी देशी वाण संवर्धन काळाची गरज आणि पुढील दिशा, जाणीव जागृती कार्यक्रम याविषयी माहिती दिली.
राष्ट्रीय वनस्पती अनुवांशिक संसाधन ब्युरो येथे कार्यरत असलेल्या डॉ. सुधीर अल्हावत व डॉ. रणबीर सिंग राठी यांनी स्थानिक पिक वाण आणि पिक पद्धतीचे महत्व विशद केले आणि स्थानिक पातळीवर सुरु असलेल्या कार्यक्रमाची प्रशंसा करून, ही काळाची गरज असल्याचे नमूद केले.
राजगुरूनगर येथील कांदा व लसूण संशोधन संचनालय येथील शास्त्रज्ञ डॉ. संकेत मोरे ह्यांनी पीक उत्पादन करताना हंगाम, पिकाचे वाण, बाजारपेठ आणि बाजारभाव तसेच आजच्या बदलत्या वातावरणाच्या आणि हवामानाचा अदांज या घटकांची माहिती दिली. बायफचे मुख्य तांत्रिक कार्यक्रम अधिकारी डॉ. विठ्ठल कौठाळे यांनी बायफ मार्फत २००९ पासून सुरु असलेल्या स्थानिक जीव विविधता कार्यक्रमाचा आढावा सादर केला.
सह्याद्री स्कूलचे व्यवस्थापकीय प्रमुख डॉ. मिलिंद मोरे यांनी शाळेमार्फत सुरु असलेल्या पिक वाण संवर्धन कार्यक्रमाची मांडणी करून पुढील दिशा आणि कृती कार्यक्रम सांगितला.
यावेळी अकोले येथील राष्ट्रीय सीड जीनोम सेवियर अवॉर्ड पुरस्कार विजेत्या ममता भांगरे व सरपंच सीमा पाचंगे सुद्धा उपस्थित होत्या. आदिवासी विकास उपयोजने अंतर्गत उपस्थित २५० शेतकऱ्यांना १५ प्रकारच्या देशी भाजीपाल्यांचे बियाणे व कृषीपयोगी अवजारांचे वाटप केले गेले.
