Diwali Grocery Donation | ' माऊली सेवा ' प्रतिष्ठानचा दिवाळीचा गोडवा! ३० गरजू कुटुंबांना दोन महिन्यांचा किराणा आणि दिवाळी फराळ भेट
दानशूरांच्या मदतीतून अवघ्या चार दिवसांत ६० हजारांहून अधिक निधी जमा; राजगुरुनगरसह दुर्गम भागातील आदिवासी, ठाकर व गरजू कुटुंबांना मदतीचा हात.
महावार्ता लाईव्ह | दिवाळीचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह घेऊन येतो. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गरजू कुटुंबांना सण साजरा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील 'माऊली सेवा प्रतिष्ठान'च्या वतीने खेड तालुक्यातील ३० गरजू कुटुंबांना दोन महिन्यांचा किराणा आणि दिवाळी फराळ भेट देण्यात आला.
माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजगुरुनगर शहरासह खेड तालुक्यातील दुर्गम भागातील अंध, दिव्यांग, मतिमंद, निराधार, वयोवृद्ध तसेच आदिवासी व ठाकर समाजातील अतिशय गरजू कुटुंबांना या उपक्रमाचा लाभ देण्यात आला. खेड तालुक्यातील गरजू कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे यांनी दानशूर व्यक्तींना आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला समाजातील दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अवघ्या चार दिवसांत ६० हजार रुपयांपेक्षा अधिक आर्थिक मदत प्रतिष्ठानच्या खात्यात जमा झाली. या रकमेतून ३० कुटुंबांसाठी किराणा किट खरेदी करण्यात आले.
या किराणा किटमध्ये गहू, तांदूळ, साखर, चहापावडर, खाद्यतेल, शेंगदाणे, तूरडाळ, पोहे, रवा, बेसनपीठ, टूथपेस्ट, साबण आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. तसेच दिवाळीनिमित्त लाडू, चिवडा, चकली, करंजी यांसह विविध फराळाचे पदार्थही भेट देण्यात आले. राजगुरुनगर, कान्हेवाडी येथील वरची व खालची ठाकरवाडी, साबुर्डी, कडूस, दोंदे, चांडोली, वहागाव, गुळाणी, वाकी खुर्द आणि बुरसेवाडी ठाकरवाडी येथील गरजू कुटुंबांपर्यंत हे किराणा किट पोहोचविण्यात आले. जीवनावश्यक वस्तू आणि दिवाळी फराळाची भेट मिळाल्याने लाभार्थी कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओसंडून वाहत होता.

या सामाजिक उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास दुधाळे यांनी आभार मानले. समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला.
यावेळी माऊली सेवा प्रतिष्ठानच्या सचिव छाया दुधाळे, सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्याध्यापक संजय घुमटकर, अविनाश पाटील, वासुदेव गोपाळे, विलासराव भास्कर, अनिल शिंदे, शिवव्याख्याते संपतराव गारगोटे, वहागावचे माजी सरपंच सत्यवान नवले, दोंदे गावच्या सरपंच प्रतीक्षा दरवडे, ॲड. संदीप देशमुख, ह.भ.प. दत्तात्रय साखरकर, कडूस गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य चांगदेव ढमाले, गोरक्ष मुळूक सर आदी मान्यवर उपस्थित होते.