Proud Moment for Anavle | अनावळे गावची सुकन्या अभिलाषा वाळुंज झेप घेणार आकाशात; पायलट प्रशिक्षणासाठी अमेरिकेला रवाना!

डोंगरदऱ्यातील गावातून अमेरिकेपर्यंत भरारी; फ्लोरिडा येथे दीड वर्ष घेणार हवाई वैमानिक प्रशिक्षण.

Proud Moment for Anavle | अनावळे गावची सुकन्या अभिलाषा वाळुंज झेप घेणार आकाशात; पायलट प्रशिक्षणासाठी अमेरिकेला रवाना!

 

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्याच्या पश्चिम दुर्गम डोंगरी भागातील आणि भामा आसखेड प्रकल्पबाधित पुनर्वसन अनावळे गावची सुकन्या कु. अभिलाषा सुभाष वाळुंज ही हवाई पायलटच्या दीड वर्ष प्रशिक्षणासाठी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) या देशात गेली आहे. प्रशिक्षणानंतर अभिलाषा वैमानिक (पायलट) होणार असल्याने गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याची भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

 

अनावळे गावच्या माजी सरपंच सुषमा सुभाष वाळुंज यांची अभिलाषा कन्या असून, हवाई पायलट होण्याचे स्वप्न बाळगून त्यासाठी अभिलाषाने खूप मेहनत घेतली. तसेच तिची हवाई पायलट प्रशिक्षणासाठी निवड होईपर्यंत आई-वडिलांचाही मोठा संघर्ष राहिला आहे.

 

 

 

अभिलाषा वाळुंज हिच्या वैमानिक होण्याच्या स्वप्नाचा पहिला भक्कम पाया Sky Jet Pilot Training Academy Pune येथे घातला गेला. या प्रवासात तिला योग्य मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य अकॅडमीचे मार्गदर्शक कॅप्टन अभिषेक शृंगारपुरे यांचे मिळाले आहे. अभिलाषा हिला शृंगारपुरे यांनी ग्राउंड क्लासेसमधील विषय शिकवून प्रत्येक विषयाची सखोल माहितीसह अभ्यासातील सातत्य, शिस्त आणि वैमानिक होण्यासाठी आवश्यक असलेला भक्कम आत्मविश्वास दिला. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देण्याचे काम त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे केले आहे. मिळालेल्या मार्गदर्शनातून व स्वतःच्या मेहनतीतून अभिलाषाने आपल्या स्वप्नाच्या दिशेने पहिले प्रशिक्षणाचे महत्त्वाचे पाऊल टाकल्याने तिचा प्रवास एका नव्या टप्प्यावर पोहोचला आहे.

 

 

अमेरिकेतील फ्लोरिडा येथे तिला प्रत्यक्ष विमान उड्डाणाचे (Flying Training) प्रशिक्षण मिळणार असून, या संधीचे सोने करण्यासाठी अभिलाषा मंगळवार (दि. २४) रोजी भारतभूमीच्या पुणे येथून अमेरिकेला गेली आहे. एका आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न, मुलीने घेतलेली मेहनत, शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन आणि आज तिला मिळालेली ही आंतरराष्ट्रीय संधी हा संपूर्ण प्रवास खरोखरच अभिमानास्पद आहे. अभिलाषाच्या या यशस्वी प्रवासात मार्गदर्शक म्हणून शृंगारपुरे यांचा मोलाचा वाटा आहे. प्रशिक्षणानंतर अभिलाषा भारतीय विमानसेवेत वैमानिक (पायलट) म्हणून येणार आहे.

 

अमेरिकेला जाण्यासाठी महाराष्ट्राची राजधानी मुबंई विमानतळावर अभिलाषा हिला शुभेच्छा देण्यासाठी अनावळे गावचे माजी सरपंच धोंडिभाऊ कुडेकर, रमेशभाई मुलाणी, बाबुशा जाधव, संदीप कुडेकर, हरिभाऊ जाधव उपस्थित होते.