Mission Water Security 2027 | टँकरमुक्त पाईट-आंबेठाणसाठी सुनीता बुट्टे पाटील ॲक्शन मोडमध्ये; ३३ गावांत राबवणार ‘जल संवाद अभियान’

दुष्काळामुळे सिमेंट रस्ते व मोठ्या इमारतींना ब्रेक; पाईट-आंबेठाण गटात खडीकरण, डांबरीकरण अन् पाणीपुरवठ्याला प्राधान्य

Mission Water Security 2027 | टँकरमुक्त पाईट-आंबेठाणसाठी सुनीता बुट्टे पाटील ॲक्शन मोडमध्ये; ३३ गावांत राबवणार ‘जल संवाद अभियान’

 

महावार्ता लाईव्ह | पाईट-आंबेठाण जिल्हा परिषद गटातील प्रलंबित विकासकामे तातडीने सुरू करणे, नव्याने मंजूर झालेल्या कामांची प्रक्रिया पूर्ण करणे आणि ऑगस्ट २०२७ पर्यंत गावोगावी व वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करणे, या उद्देशाने गटाची प्रभाग सभा वराळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. जिल्हा परिषद सदस्या व पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्या सुनिता बुट्टे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली.

 

सभेचे कामकाज सचिव म्हणून विस्तार अधिकारी एस. एस. साळुंखे यांनी पाहिले. यावेळी पंचायत समिती सदस्या श्रद्धा मांडेकर, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा व लघु पाटबंधारे विभागांचे अधिकारी, तसेच गटातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी आणि प्रशासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

३३ गावांत ‘जल संवाद अभियान’

आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १ डिसेंबरपासून गटातील सर्व ३३ गावांमध्ये ‘गावोगावी जल संवाद अभियान’ राबवले जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक गाव व वाडी-वस्तीवर जाऊन नागरिक आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला जाईल. त्यातून ‘दुष्काळ निवारण व जलसुरक्षा कृती आराखडा’ तयार करून ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन केले जाणार आहे. या अभियानाच्या सुसूत्र नियोजनासाठी आजच्या सभेत सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती व माहिती तक्ता उपलब्ध करून देण्यात आला.

 

 

टँकरमुक्तीसाठी निधीचा प्रभावी वापर

गटातील कोणत्याही गावात टँकर सुरू करण्याची वेळ येऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यासाठी जिल्हा परिषद निधी, जिल्हा वार्षिक योजना आराखडा आणि वित्त आयोगाच्या निधीचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. मार्च २०२६ मध्ये मंजूर झालेली कामे तातडीने सुरू करून वेळेत पूर्ण करावीत, तसेच १५ व्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायतींकडे शिल्लक असलेला निधी तात्काळ खर्च करावा, अशा सूचना सुनिता बुट्टे पाटील यांनी केल्या. या कामी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

वस्तीतील कामे आणि निधीचे नियोजन

अनुसूचित जाती व जमातीच्या वस्त्यांमध्ये मंजूर करण्यात आलेली विकासकामे प्राधान्याने आणि वेळेत पूर्ण करावीत. ग्रामपंचायतींकडे आलेला कोणताही निधी खर्च न होता परत जाणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

 

दुष्काळामुळे विकासकामांच्या स्वरूपात बदल

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता निधीच्या प्राधान्यक्रमात बदल करण्यात आल्याचे सुनिता बुट्टे पाटील यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, "यावर्षी दुष्काळामुळे मोठ्या इमारतींची कामे आणि सिमेंट काँक्रीटचे रस्ते मंजूर केले जाणार नाहीत. त्याऐवजी खडीकरण व डांबरीकरणाचे रस्ते आणि अस्तित्वातील कामांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल."

 

 

अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे..

प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कोणतेही काम न थांबवता नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वेगाने काम करावे. तालुका प्रशासनाने त्यांना पूर्ण सहकार्य करावे, तसेच लोकाभिमुख कामे धाडसाने पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी अपेक्षाही सुनिता बुट्टे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.