Pune zp | 'अजित जनसंवाद विकास' अभियान खेड तालुक्यातील पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटात शुभारंभ

अभियानाचा शुभारंभ खेड तालुक्यातील पाईट-आंबेठाण जिल्हा परिषद गटातून करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी विविध विकासकामांचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला

Pune zp | 'अजित जनसंवाद विकास' अभियान खेड तालुक्यातील पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गटात शुभारंभ

 

महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेले अजित जनसंवाद विकास अभियान जिल्ह्यातील 73 जिल्हा परिषद गटात राबविण्यात येणार असून, या अभियानाचा शुभारंभ आज खेड तालुक्यातील पाईट-आंबेठाण जिल्हा परिषद गटातून करण्यात आला.

 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार (दि. 16) रोजी दिवसभर पाईट-आंबेठाण या जि.प. गटातील ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र यांची पाहणी, गाव पातळीवरील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, कर्मचाऱ्यांशी संवाद आणि जिल्हा परिषद गटातील सर्व विभागाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी शासकीय बैठक अशा स्वरूपामध्ये हे अभियान राबवण्यात आले. या गटाच्या सदस्या सुनीता शरद बुट्टे पाटील यांनी नियोजन केले होते.

 

 

अभियान दौऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, कृषी सभापती अमोल नलावडे, माजी सभापती शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुनीता बुट्टे पाटील, गणेश बोत्रे, पंचायत समिती सदस्य श्रद्धा मांडेकर यांचेसह गटविकास अधिकारी विशाल शिंदे, जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत चोगुले, गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले, वैद्यकीय अधिकारी विलास माने आदी उपस्थित होते.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतील आंबेठाण प्राथमिक शाळेला भेट देऊन सुरू असलेल्या भौतिक सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रमाची माहिती घेण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि शिक्षकांशी यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते या देखील उपस्थित होत्या.

 

 

त्यानंतर कोरेगाव खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि आरोग्य उपकेंद्राची पाहणी करून ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि स्थानिक कर्मचारी यांच्याशी चर्चा करताना स्थानिक अडचणी देखील समजून घेतल्या.

 

त्यानंतर पाईट येथे जनसंवाद कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद गटातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे प्राधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांच्याशी अध्यक्ष जगदाळे यांनी संवाद साधला. विविध गावचे नागरिक अनेक विविध विषयांची निवेदने घेऊन यावेळी उपस्थित होते. या सर्वांची निवेदने अध्यक्ष जगदाळे आणि कृषी सभापती नलावडे यांनी स्वीकारली आणि त्यांचे विषय देखील समजावून घेतले.

 

 

जनसंवाद अभियानामध्ये आंबेठाण, कोरेगाव खुर्द, गोणवडी, पिंपरी खुर्द, भांबोली, कोळीये, गडद, देवतोरणे, हेदृज, पाईट, तळवडे, रौंधळवाडी, कोये, धामणे, कुरकुंडी, किवळे, अहिरे, कोरेगाव बुद्रुक आदी विविध गावातील नागरिकांनी विविध प्रश्नांच्या संबंधी निवेदने जिल्हा परिषद अध्यक्षांकडे दिली आहेत.

 

त्यानंतर जिल्हा परिषद गटातील विविध विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी शासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये रस्ते विकास, पाणीपुरवठा, जलसंधारण, आरोग्य, शिक्षण, महिला बालविकास, यासह विविध विभागातील सुरू असलेली कामे, पूर्ण कामे आणि नियोजित योजना याबद्दल चर्चा करण्यात आली.

कामाची मुदत संपल्यानंतर कामे प्रलंबित ठेवणाऱ्या कंत्राटदारांकडून कामे काढून घेण्यात यावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी कडक सूचना यावेळी अध्यक्ष जगदाळे यांनी केली.

 

 

अर्धवट अंगणवाडीची कामे पूर्ण करावी, रस्त्यांचे खड्डे भरण्यासाठी अतिरिक्त निधी मिळावा, शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात, कोरेगाव बुद्रुक आणि कोरेगाव खुर्द या दोन्ही आरोग्य उपकेंद्रांसाठी नवीन इमारतीसाठी निधी द्यावा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विकास कामांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा, जल जीवन मिशन योजनेतील अर्धवट पाणी योजनांची कामे पूर्ण व्हावीत. त्यासाठी काही योजनांना पूरक निधी मिळावा, अशा विविध मागण्या या गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सुनीता बुट्टे पाटील यांनी अध्यक्षांकडे केल्या.

 

या बैठकीला जिल्हा परिषद बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत चौगुले, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील भोईर, शिक्षणाधिकारी अमोल जंगले, बांधकामचे उपअभियंता कचरे, तालुका आरोग्य अधिकारी विलास माने, श्रीकर येवले, उपअभियंता छोपावी, रूपाली तांदळे, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा कालिका खरात, कृषी अधिकारी सोनाली पवार, विस्तार अधिकारी सुखदेव साळुंखे, के. बी. मोरे, दिपक जंबुकर, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

 

 

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाईट पाझर तलावाची देखील अध्यक्षांनी यावेळी पाहणी केली आणि लवकरच या पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले.

या अभियानातील सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय मांडेकर, सुनील देवकर, तुकाराम गवारी, शरद निखाडे, पल्लवी जयसिंग दरेकर, ज्योती कुंभार, परविन इनामदार, भरत रौंधळ, नितीन डांगले, सुनील डांगले, सागर राळे या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.