iPhone 17 Pro Snatched | उबेर चालकाला गाडी नीट चालवण्यास सांगणे पडले महागात; आयफोन १७ प्रो हिसकावून दोघे पसार
चाकणहून वाकडला जाणाऱ्या प्रवाशाने गाडी नीट चालवण्यास सांगितल्याने चिडलेल्या उबेर चालकाने साथीदाराच्या मदतीने त्याचा आयफोन १७ प्रो हिसकावून पळ काढला. पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल.
महावार्ता लाईव्ह | वेडीवाकडी कार चालवणाऱ्या उबेर (Uber) चालकाला गाडी नीट चालवण्यास किंवा खाली उतरवण्यास सांगणे एका प्रवाशाला चांगलेच महागात पडले आहे. याचा राग आल्याने चालक आणि त्याच्या साथीदाराने प्रवाशाला शिवीगाळ करत त्याचा महागडा 'आयफोन १७ प्रो' जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. ही घटना २४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास चिंचवड येथील शितल हॉटेलसमोरील रस्त्यावर घडली.
या प्रकरणी सौरभ दीपक महाजन (वय २७, रा. डांगे चौक, वाकड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चालक शुभम विठ्ठल शेलकर (रा. नाणेकरवाडी, चाकण) आणि त्याचा साथीदार ईश्वर शशिराव झांबरे (रा. चाकण-शिक्रापूर रोड, चाकण) या दोघांविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ महाजन हे चाकण येथील स्कोडा फॉक्सवॅगन कंपनीतून आपल्या वाकड (डांगे चौक) येथील घरी जाण्यासाठी उबेरच्या वॅगनर कारमधून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान चालक हा कार वेडीवाकडी चालवत असल्याने महाजन यांना भीती वाटली. त्यामुळे त्यांनी चालकाला "कार नीट चालवा, नाहीतर मला खाली उतरवा," असे सांगितले.
या गोष्टीचा राग आल्याने आरोपी चालकाने चिंचवड येथील शितल हॉटेलसमोरील रस्त्यावर कार थांबवून महाजन यांना शिवीगाळ केली. त्यानंतर महाजन यांच्याकडून भाड्याचे पैसे ऑनलाइन घेत असतानाच आरोपीने त्यांचा अॅपल कंपनीचा 'आयफोन १७ प्रो' हा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. इतकेच नव्हे, तर आरोपीने त्यांची लॅपटॉपची बॅगही हिसकावण्याचा प्रयत्न केला. यामुळे महाजन कारमधून खाली उतरले असता, आरोपी चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या इसमानेही खाली उतरून त्यांच्याकडील लॅपटॉपची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. अखेर दोघेही पुन्हा कारमध्ये बसून फिर्यादीचा आयफोन घेऊन घटनास्थळावरून पळून गेले.
या घटनेनंतर २५ नोव्हेंबर रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक केणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.