साईजी मल्टीकॉनवर गंभीर आरोप! ‘फुल पेड कार’चे आश्वासन अन् पैशांचा हिशेब; ट्रेनर संदीप दातखिळे कुटुंबासह तहसीलसमोर आंदोलनात!

साईजी मल्टीकॉनवर गंभीर आरोप! ‘फुल पेड कार’चे आश्वासन अन् पैशांचा हिशेब; ट्रेनर संदीप दातखिळे कुटुंबासह तहसीलसमोर आंदोलनात!

 

महावार्ता लाईव्ह | नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत साईजी मल्टीकॉन कंपनीविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कंपनीचे ट्रेनर संदीप दशरथ दातखिळे यांनी कुटुंबासह राजगुरुनगर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले असून, कंपनीकडून आश्वासन दिलेली ‘फुल पेड कार’ न मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या आंदोलनामुळे खेड तालुक्यात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

 

दातखिळे यांच्या आरोपानुसार, त्यांनी कंपनीला १५ ते २० लाख रुपयांचा व्यवसाय मिळवून दिला आणि ५०० जोड्यांचा टप्पा पूर्ण केला. त्यानंतरही कार देण्याबाबत टाळाटाळ करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नेटवर्क मार्केटिंगमधून जमा झालेला पैसा अभी डेव्हलपर्स आणि अभी रिअल्टर्स या कंपन्यांकडे वळवण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.

 

या प्रकरणी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केल्याचे दातखिळे यांनी सांगितले. साईजी मल्टीकॉन, अभी डेव्हलपर्स आणि अभी रिअल्टर्स या कंपन्यांच्या व्यवहारांची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांकडून तातडीने कारवाई न झाल्यास पुरावे आणि कागदपत्रांसह पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.