Khed Accident News | राक्षेवाडीत एसटी बसच्या धडकेत एमपीएससी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे

अपघातानंतर चालक-वाहकाचे पलायन; भोमाळे गावावर शोककळा, अतिक्रमणाविरोधात नागरिकांचा संताप ; चांडोली रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

Khed Accident News | राक्षेवाडीत एसटी बसच्या धडकेत एमपीएससी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे

 

​महावार्ता लाईव्ह | राजगुरूनगरजवळील राक्षेवाडी (ता. खेड) येथे एसटी बसने दिलेल्या जोरदार धडकेत एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. कु. सोनाली रोहिदास कुळेकर असे मृत तरुणीचे नाव असून, ही हृदयद्रावक घटना मंगळवार (दि. २४) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

 

​सोनाली ही खेड तालुक्यातील भोमाळे गावची मूळ रहिवासी होती. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी ती राक्षेवाडी हद्दीत राहत होती. मंगळवारी सायंकाळी ती राक्षेवाडीतील गणेश मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावरून स्कुटीवरून जात होती. यावेळी वाफगाव-गुळाणीकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी बसने तिच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे सोनाली रस्त्यावर कोसळली आणि बसचे चाक तिच्या पोटावरून गेल्याने तिचा जागीच अंत झाला. अपघात घडताच बसचे चालक आणि वाहक घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेनंतर अपघातस्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.

 

​जिद्दी तरुणीचे अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे 

सुतार समाजातील गरीब कुटुंबातील सोनाली ही अत्यंत हुशार आणि जिद्दी मुलगी होती. घरची परिस्थिती बेताची असतानाही, आई-वडिलांच्या भक्कम पाठिंब्यावर तिने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते आणि त्यासाठी ती एमपीएससीची तयारी करत होती. कुळेकर कुटुंबातील चार बहिणींमध्ये ती सर्वात लहान होती. तिच्या पश्चात आई, वडील आणि बहिणी असा परिवार आहे. सोनालीच्या निधनाची बातमी समजताच भोमाळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात आणला असता नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

 

​चालकाच्या वेगाबाबत नागरिकांत तीव्र नाराजी

अपघातस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी बस चालकाच्या चुकीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. रहदारीच्या रस्त्यावरून एसटी बस चालवताना चालकाचे वेगावर नियंत्रण असणे गरजेचे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.

 

​अतिक्रमणाच्या विळख्यात राक्षेवाडी-वाफगाव रस्ता

​पाबळ रोडपासून राक्षेवाडी हद्दीतून जाणाऱ्या वाफगाव-गुळाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अनेक व्यावसायिकांनी दुकानांपुढे थेट रस्त्यापर्यंत अनधिकृत पत्रा शेड उभारले आहेत, तर काहींनी दुकानांसमोर मोठमोठे दगड ठेवले आहेत. भाजीपाला विक्रेतेही रस्त्याला खेटून विक्रीसाठी बसत असल्याने, मुळात रुंद असलेला हा रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे.

 

​या अतिक्रमणामुळे वाहनचालक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करत प्रवास करावा लागतो. या गंभीर बाबीकडे राजगुरूनगर नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग आणि महसूल विभागाचे अक्षरशः दुर्लक्ष झाले आहे. या सर्व शासकीय विभागांनी एकत्रित अतिक्रमणविरोधी कारवाई करून दुकानासमोरील अनधिकृत पत्रा शेड हटवावेत व रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास या रस्त्यावर दररोज अपघातांची मालिका सुरू होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.