Aalandi Murder | आळंदीतील ठाकर वस्तीत दुहेरी हत्याकांड: ७० वर्षीय वृद्ध महिला आणि ६ वर्षांच्या चिमुरडीची धारदार शस्त्राने निघृण हत्या

मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला आणि झोपेत असलेल्या दोघींवर धारदार शस्त्राने सपासप वार केले

Aalandi  Murder | आळंदीतील ठाकर वस्तीत दुहेरी हत्याकांड: ७० वर्षीय वृद्ध महिला आणि ६ वर्षांच्या चिमुरडीची धारदार शस्त्राने निघृण हत्या

 

महावार्ता लाईव्ह | आळंदी (पुणे) तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. ठाकर वस्तीतील एका घरात ७० वर्षीय वृद्ध महिलेसह केवळ ६ वर्षांच्या लहान मुलीची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

मृत व्यक्तींची नावे मंगला चंद्रकांत शिंदे (वय ७० वर्ष) आणि धनश्री केदारे (वय ६ वर्ष) अशी आहेत. धनश्रीची आजी संगीता केदारे (वय ४७ वर्ष) या एका खासगी रुग्णालयात हाऊसकीपिंगचे काम करतात. बुधवारी रात्री त्या नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेल्या होत्या. जाण्यापूर्वी त्यांनी आपली ६ वर्षांची नात धनश्री हिला शेजारी राहणाऱ्या मंगला शिंदे यांच्याकडे झोपण्यासाठी सोडले होते.

 

मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला आणि झोपेत असलेल्या दोघींवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. हल्ला इतका भीषण होता की, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दोन्ही जागीच मृत्यू झाला. हा हल्ला इतका क्रूर होता की, घटनास्थळी रक्ताचा थारोळा पसरला होता.

 

आज सकाळी ही घटना उघडकीस आली तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी पाहिलेल्या दृश्याने सर्वांचे हृदय पिळवटून निघाले. आळंदी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले.

 

घटनेच्या गांभीर्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संगीता केदारे यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आता सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील साक्षीदार आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.

 

ही घटना आळंदी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्रात घडल्याने भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून, लवकरात लवकर आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.


पोलिस उपअधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकारी सध्या घटनास्थळी तपास करत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

या प्रकारच्या निर्घृण घटनेवर तातडीने कारवाई व्हावी आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याची मागणी नागरिक करत आहेत. अधिक अपडेट्ससाठी पोलिसांकडून अधिकृत माहिती येण्याची वाट पाहिली जात आहे.