khed shivsena political news | खेड तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात नेमकं काय सुरू?

सलग दोन दिवसांत प्रमुख नेत्यांच्या हालचालींमुळे राजकीय चर्चांना उधाण

khed shivsena political news | खेड तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात नेमकं काय सुरू?

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात सध्या नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी सुरू आहेत, याबाबत तालुक्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. सलग दोन दिवसांत पक्षातील प्रमुख नेत्यांच्या झालेल्या हालचालींमुळे आगामी राजकीय समीकरणांबाबत तर्क-वितर्कांना वेग आला आहे.

 

काल खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत खेड तालुक्यातील माजी उपसभापती अमोल पवार यांचे जाहीरपणे कौतुक केले. विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी इच्छुक असूनही पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही, तरीदेखील अमोल पवार आजही पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी त्यांच्या निष्ठेचा गौरव केला. राऊत यांच्या या वक्तव्याची तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली.

 

विशेष म्हणजे, खासदार संजय राऊत यांनी अमोल पवार यांच्या निष्ठेचे जाहीरपणे कौतुक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हाप्रमुख रामदास आबा धनवटे आणि उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे यांनीही थेट पक्षाचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान आमदार बाबाजी काळे उपस्थित नसल्याची बाबही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असला तरी सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने आमदार बाबाजी काळे हे अधिवेशनात आहेत हे स्पष्टच आहे.

 

या सलग घडामोडींमुळे खेड तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात काही महत्त्वाच्या राजकीय किंवा संघटनात्मक हालचाली सुरू आहेत का, याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वामध्ये नेमके काय शिजत आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी या भेटींच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील या हालचालींकडे आता कार्यकर्त्यांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 


या भेटींमागे नेमका उद्देश काय, पक्ष संघटनेत काही बदल होणार आहेत का, अथवा आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन रणनीती आखली जात आहे का, याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे या सर्व घडामोडींमागील नेमके कारण काय आहे, याचे उत्तर येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

एकूणच, सलग दोन दिवसांत झालेल्या या राजकीय हालचालींनी खेड तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या राजकारणाबाबत उत्सुकता वाढवली असून, आगामी काळात पक्षातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.