Khed | पावसात भिजू नये म्हणून भिंतीच्या आडोशाला बसलेल्या महिलेच्या अंगावर भिंत कोसळून जागीच मृत्यू; गवंड्याचे दोन्ही पाय मोडले

खेड तालुक्यातील तळवडे येथे दुर्दैवी घटना

Khed | पावसात भिजू नये म्हणून भिंतीच्या आडोशाला बसलेल्या महिलेच्या अंगावर भिंत कोसळून जागीच मृत्यू; गवंड्याचे दोन्ही पाय मोडले

 

महावार्ता लाईव्ह | दुपारी साधारण ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास जोराचा पाऊस सुरू झाल्याने भिंतीच्या आडोशाला बसलेल्या ५५ वर्षीय महिलेच्या अंगावर अर्धवट बांधकाम असलेली भिंत कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला. त्याच वेळी भिंतीचे काम करणारा गवंडी खाली पडून गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय मोडले आहेत. यात इतर काही कामगार किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

 

ही घटना खेड तालुक्यातील तळवडे गावातील ठाकरवाडी जवळील मुसळेवस्ती येथे घडली. मयत अलकाबाई गणपत मुसळे (वय ५५, रा. तळवडे) यांच्या पोल्ट्रीच्या नवीन बांधकामाचे काम सुरू होते. दुपारी अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने अलकाबाई भिजू नये म्हणून आपल्या पोल्ट्रीच्या भिंतीच्या आडोशाला बसल्या होत्या. त्याच वेळी अचानक भिंत कोसळल्याने ती त्यांच्या अंगावर पडली आणि त्या जागीच ठार झाल्या.

 

भिंतीवर काम करणारे गवंडी गोपाळ चव्हाण हे भिंतीवर बसून काम करत होते. भिंत कोसळताच ते खाली पडले. या दुर्घटनेत त्यांचे दोन्ही पाय मोडले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने पाईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

या अपघातात इतर काही कामगार किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोल्ट्रीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भिंत अर्धवट बांधलेली होती. जोराचा पाऊस आणि त्यामुळे माती ओली होऊन भिंतीची मजबुती कमी झाल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक कारणे समोर येत आहेत.