जुन्नरच्या मातीतले वादळ कायमचे शांत झाले; ‘आशाताई म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजे आशाताई’ – शरद बुट्टे पाटील
आशाताई बुचके यांच्या निधनानंतर शरद बुट्टे पाटील यांनी त्यांच्या संघर्षशील राजकीय प्रवासाच्या आणि सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
आज सकाळी आशाताई बुचके यांच्या दुःखद निधनाचे वृत्त आले आणि क्षणभर मन सुन्न झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुन्नरच्या मातीतले एक धगधगते वादळ आज कायमचे शांत झाले. अन्यायाविरुद्ध तुटून पडणारा आवाज थांबला; सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाला जाब विचारणारी रणरागिणी काळाच्या पडद्याआड गेली. आशाताईंचे जाणे ही केवळ जुन्नर तालुक्याची किंवा पुणे जिल्ह्याची हानी नाही, तर संघर्षातून स्वतःचे नेतृत्व सिद्ध करणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिला नेतृत्वाची मोठी हानी आहे.
‘जुन्नर तालुक्याच्या रणरागिणी’ म्हणून आशाताई जिल्ह्यात आणि राज्यात परिचित होत्या. आक्रमकता, धाडस, स्पष्टवक्तेपणा आणि अखंड संघर्ष ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये होती. त्यांच्या आवाजात रणशिंगाची ललकारी होती, नजरेत अन्यायाला भिडण्याचे सामर्थ्य होते आणि मनात जुन्नरच्या मातीविषयी अपार प्रेम होते. त्या सभागृहात उभ्या राहिल्या की शब्दांना धार चढायची, प्रशासन सावध व्हायचे आणि प्रलंबित प्रश्नांना अचानक गती मिळायची.
माझा आणि आशाताईंचा स्नेहबंध हा जवळपास पंचवीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील असंख्य आठवणींनी विणलेला आहे. २००२ मध्ये आम्ही दोघेही पहिल्यांदा पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आलो. २००२ ते २०१२ ही दहा वर्षे आणि पुन्हा २०१७ ते २०२२ ही पाच वर्षे—अशी एकूण पंधरा वर्षे आम्ही जिल्हा परिषदेच्या सभागृहात एकत्र काम केले. त्यामुळे त्यांचे नेतृत्व, त्यांचा संघर्ष, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या आक्रमक व्यक्तिमत्त्वामागे दडलेले हळवे मन मला अगदी जवळून अनुभवता आले.
आशाताईंनी चार वेळा पुणे जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या पाच आणि विधानसभेच्या पाच निवडणुका लढवल्या. प्रत्येक निवडणूक म्हणजे त्यांच्या दृष्टीने केवळ सत्ता मिळविण्याची लढाई नव्हती; ती आपल्या विचारांची, कार्यकर्त्यांच्या विश्वासाची आणि जुन्नरच्या स्वाभिमानाची परीक्षा होती.
सामान्य कुटुंबातून आलेल्या एका महिलेने मुंबईतील वास्तव्य आणि संघटनात्मक कामाचा अनुभव सोबत घेऊन जुन्नरच्या मायभूमीत परतावे, स्वतःच्या हिमतीवर नेतृत्व उभे करावे आणि पुण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यातून सलग चार वेळा जिल्हा परिषदेवर निवडून यावे, ही साधी गोष्ट नव्हती. त्यासाठी जनतेशी असलेली नाळ, कार्यकर्त्यांवरील विश्वास आणि संकटांसमोर न झुकणारी दुर्दम्य इच्छाशक्ती आवश्यक असते.
चार विधानसभा निवडणुकांमधील निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्यानंतरही पाचव्यांदा पुन्हा रणांगणात उतरण्याचे धाडस आशाताईच करू शकत होत्या. पराभवाने त्यांच्या पावलांना कधी बेड्या घातल्या नाहीत. प्रत्येक पराभवानंतर त्या अधिक जिद्दीने उभ्या राहिल्या. संघर्ष त्यांच्या वाट्याला आला नव्हता; त्यांनी संघर्षालाच आपला सोबती बनविले होते. म्हणूनच आशाताई म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजे आशाताई, असे समीकरण तयार झाले होते.
पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांचा दरारा विलक्षण होता. सर्वसाधारण सभा असो किंवा स्थायी समितीची बैठक—त्या एखादा प्रश्न घेऊन उभ्या राहिल्या की संपूर्ण सभागृहाचे लक्ष त्यांच्याकडे वळायचे. त्यांच्या आवाजात केवळ आक्रमकता नव्हती; त्यामागे अभ्यास, नियमांची जाण आणि अन्यायाविरुद्धचा संताप असायचा. जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. सभागृहाचे नियम, प्रशासकीय प्रक्रिया आणि विविध योजनांची त्यांना उत्तम माहिती होती.
सभागृहातील अनेक निवडणुका आणि प्रशासकीय निर्णयांच्या संदर्भात त्यांनी निर्भीड भूमिका घेतली. एखादा निर्णय नियमबाह्य वाटला, तर विभागीय आयुक्त किंवा राज्य शासनापर्यंत दाद मागण्यास त्यांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही. एखादा प्रश्न त्यांनी हाती घेतला की त्याचा निकाल लागेपर्यंत त्या त्याचा पाठपुरावा करीत. प्रश्न छोटा आहे की मोठा, संबंधित व्यक्ती परिचित आहे की अपरिचित, कोणत्या पक्षाची आहे—या गोष्टींना त्यांच्या लेखी महत्त्व नव्हते. अन्याय झाला आहे, एवढेच त्यांच्यासाठी पुरेसे असायचे.
जिल्ह्यातील एखादा अन्यायग्रस्त कार्यकर्ता जिल्हा परिषदेत त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आला की त्या क्षणाचाही विलंब न करता त्याला सोबत घेऊन संबंधित अधिकाऱ्याच्या दालनात पोहोचायच्या. “या माणसाचे काम का केले नाही?” असा थेट जाब विचारण्याची त्यांची पद्धत होती. त्यांचा रोख स्पष्ट आणि शब्द परखड असायचे. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांशी त्यांचे मतभेद आणि संघर्ष झाले. मात्र त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे, तर जनतेच्या न्यायासाठी ही किंमत मोजली.
स्थायी समितीतील एक संघर्ष इतका टोकाला गेला की विषय पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आणि आशाताईंना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. परंतु संकट कितीही मोठे असले, तरी त्या कधी मागे हटल्या नाहीत. त्यांच्या स्वभावात माघार हा शब्दच नव्हता. त्या झंझावातासारख्या होत्या—अडथळे आले की अधिक वेगाने पुढे जाणाऱ्या!
आशाताईंचे सार्वजनिक रूप जितके आक्रमक होते, तितक्याच त्या व्यक्तिगत आयुष्यात प्रेमळ आणि माणुसकीने ओथंबलेल्या होत्या. सभागृहात एखाद्या सदस्याशी कडाडून वाद घालणाऱ्या आशाताई सभा संपल्यानंतर त्याच सदस्याची आपुलकीने विचारपूस करीत. राजकीय मतभेदांचा परिणाम त्यांनी व्यक्तिगत संबंधांवर होऊ दिला नाही. विरोधी पक्षातील अनेक सदस्य आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
जुन्नरहून जिल्हा परिषदेला येताना त्या आठ-दहा माणसांना पुरेल एवढा जेवणाचा डबा घेऊन यायच्या. जिल्हा परिषदेतील सदस्य, पदाधिकारी आणि आमचे पत्रकार सहकारी यांना आग्रहाने सोबत घेऊन त्या जेवायच्या. त्यांच्या डब्यात केवळ अन्न नसायचे; त्यात जुन्नरच्या मातीचा सुगंध आणि ताईंच्या प्रेमाचा गोडवा असायचा. मुंबईहून परतताना सर्वांसाठी काहीतरी गोडधोड घेऊन येणेही त्यांनी कधी विसरले नाही. सभागृहात वीज बनून कडाडणाऱ्या आशाताईंच्या अंतःकरणात मायेचा अखंड झरा वाहत होता.
त्या आपल्या कार्यकर्त्यांसाठी केवळ नेत्या नव्हत्या; त्या त्यांचे संरक्षक कवच होत्या. कार्यकर्त्यावर संकट आले, अन्याय झाला किंवा प्रशासनाकडून अडवणूक झाली की आशाताई त्याच्या पाठीशी डोंगरासारख्या उभ्या राहायच्या. पाच विधानसभा निवडणुका लढवल्यामुळे जुन्नर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात त्यांचा संपर्क होता. गावागावांतील कार्यकर्त्यांना त्या नावाने ओळखत. कोणत्या गावात कोणता प्रश्न आहे, कोणत्या कुटुंबाला मदतीची गरज आहे आणि कोणता कार्यकर्ता कोणत्या अडचणीत आहे, याची त्यांना माहिती असायची.
संघर्षाबरोबरच आशाताईंनी जुन्नर तालुक्यात विकासाची अनेक विधायक कामे केली. जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या असंख्य योजना त्यांनी तालुक्यात खेचून आणल्या. एखादी योजना राज्यस्तरावर मार्गी लागत नसेल, तर त्या थेट दिल्ली गाठून केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत. जनतेच्या कामासाठी मंत्रालयाची पायरी चढताना किंवा दिल्लीच्या दरवाजापर्यंत पोहोचताना त्यांना कधी संकोच वाटला नाही.
विशेषतः गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शस्त्रक्रिया करणे शक्य नसलेल्या अनेक रुग्णांसाठी त्यांनी मोठे आर्थिक साहाय्य मिळवून दिले. अशा रुग्णांच्या मदतीसाठी त्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत. एखाद्या गरजू कुटुंबाचा छोटासा वाटणारा प्रश्नही त्या संपूर्ण ताकदीने लावून धरत आणि त्याची तड लागेपर्यंत स्वस्थ बसत नसत.
आशाताई बहुतांश काळ विरोधी पक्षात राहिल्या. सुरुवातीला शिवसेना आणि नंतर भारतीय जनता पक्षामध्ये काम करताना संघर्ष हाच त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा स्थायीभाव राहिला. सत्ता जवळ नसतानाही त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्याची ताकद निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या नावाभोवती संघर्षशील आणि आक्रमक नेतृत्वाचे वलय तयार झाले.
मात्र या वलयामागे त्यांचे भरीव विकासकार्य काहीसे झाकोळले गेले. पारुंडे–वैष्णवधाम परिसरात त्यांनी केलेले जलसंधारणाचे काम उल्लेखनीय आहे. आपल्या ग्रामपंचायतीसाठी त्यांनी सर्व सुविधांनी सुसज्ज असे भव्य ग्रामपंचायत कार्यालय उभारले. परिसरात रस्त्यांचे जाळे निर्माण केले. विविध शासकीय योजना आणून ग्रामीण विकासाला चालना दिली आणि अनेक अभियानांमध्ये उत्तम कामगिरी घडवून आणली. त्यांचे रचनात्मक कार्य मोठे होते; परंतु त्यांच्या आक्रमक प्रतिमेच्या प्रकाशात त्यांची व्यक्तिगत मदत आणि विधायक कामे अनेकदा पडद्याआड राहिली.
“हा माझा तालुका आहे आणि माझ्या तालुक्यातील प्रत्येक प्रश्न सुटलाच पाहिजे,” ही त्यांची ठाम भूमिका होती. जुन्नरच्या मातीवरील त्यांचे प्रेम हे केवळ भाषणातील शब्द नव्हते; ते त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवत असे. तालुक्यावर अन्याय होतो आहे असे वाटले, तर त्या कोणतीही किंमत मोजून उभ्या राहत.
त्यांचा स्वभाव आक्रमक असल्यामुळे त्यांना समजावून सांगण्याचे धाडस फार कमी मंडळी करीत. माझ्यासह संभाजीनाना होळकर, प्रदीपदादा कंद, दत्तामामा भरणे, पत्रकार विठ्ठल जाधव आणि प्रकाश भोईटे अशी काही मंडळी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत असू.
एकदा मी त्यांना अत्यंत शांतपणे सांगितले होते, “ताई, आक्रमकपणा थोडा कमी करा. लोकांचे प्रश्न सुटत आहेत; पण त्याचा तुमच्या प्रकृतीलाही त्रास होतो. तुमची भूमिका योग्य आहे, मात्र या संघर्षात काही माणसे दुखावली जातात. अनेकदा खरे आणि स्पष्ट बोलणारी माणसे लोकांना सहज आवडत नाहीत.”
त्या माझे म्हणणे ऐकत; पण अन्यायाचा प्रश्न समोर आला की त्यांच्या स्वभावातील रणरागिणी पुन्हा जागी व्हायची. कारण आक्रमकता हा त्यांनी परिधान केलेला मुखवटा नव्हता; ती त्यांच्या संवेदनशीलतेतून आणि न्यायाच्या तीव्र जाणिवेतून जन्मलेली वृत्ती होती.
मी भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष असताना सुरुवातीच्या काळात आमच्यात थोडासा दुरावा निर्माण झाला होता. मात्र तो फार काळ टिकला नाही. नंतर त्या प्रत्येक कार्यक्रमासाठी मला आग्रहाने बोलवायच्या.
“भाऊ, तुम्ही माझ्याकडे आलेच पाहिजे. माझ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की शरदभाऊंचे भाषण झाले पाहिजे. तुमचे भाषण कार्यकर्त्यांना प्रेरणा देते, कार्यक्रमाचे वातावरण तयार करते,” असा त्यांचा पराकोटीचा आग्रह असायचा.
त्यांचा आग्रह मोडणे मला शक्य नसायचे. मीही माझी इतर कामे बाजूला ठेवून ताईंच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत असे. त्यांच्या प्रशासकीय ज्ञानाबद्दल, समाजहितासाठीच्या आक्रमक भूमिकेबद्दल आणि जुन्नरच्या मातीवरील त्यांच्या अतूट प्रेमाबद्दल मी भाषणातून आवर्जून बोलत असे. माझ्या शब्दांमधून त्यांच्या कार्याचा गौरव झाला की त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान आजही डोळ्यांसमोर आहे.
काही दिवसांपूर्वीच आशिष माळवदकर यांच्या कुटुंबातील विवाहानिमित्त व्यासपीठावर आमची भेट झाली होती. मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ती भेट अखेरची ठरेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. आयुष्य कधी कोणत्या वळणावर निरोपाची रेघ आखेल, हे खरोखरच कुणाला सांगता येत नाही.
साधारण २०१६ च्या दरम्यान त्यांना कावीळ झाली होती. त्या वेळीही अनेक दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. जवळपास दहा वर्षांनंतर आजाराने पुन्हा डोके वर काढले आणि त्यांना पुन्हा दीर्घकाळ उपचार घ्यावे लागले. शरीरयष्टीने त्या धिप्पाड आणि मनाने पोलादी होत्या. रक्तदाब किंवा मधुमेहासारखे आजार नसतानाही नियतीने त्यांच्यावर हा कठोर घाव घातला.
आशाताई मनाने अत्यंत खंबीर होत्या. पराभवाने त्या कधी खचल्या नाहीत. आपण सत्तेत आहोत की विरोधात, याचा विचार करून त्यांनी कधी काम केले नाही. सत्तेचे छत्र नसतानाही संघर्षाच्या उन्हात उभे राहून त्यांनी जनतेसाठी लढणे पसंत केले. पदे आली आणि गेली, निवडणुकांचे निकाल बदलले; पण जुन्नरच्या मातीसाठी धडधडणारे त्यांचे हृदय आणि संघर्षाची मशाल अखेरपर्यंत तेवत राहिली.
आज त्यांच्या निधनानंतर जिल्ह्यातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मला दूरध्वनी आले. प्रत्येकाच्या ओठांवर आशाताईंची एक वेगळी आठवण आहे. कुणाला त्यांचा संघर्ष आठवतो, कुणाला त्यांचा स्पष्टवक्तेपणा, कुणाला त्यांनी केलेली मदत; तर कुणाला त्यांच्या डब्यातील प्रेमाचा घास आठवतो. एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर तिच्या स्मृती अनेकांच्या मनात अशा वेगवेगळ्या रूपांनी जाग्या होतात, तेव्हाच तिच्या आयुष्याची व्यापकता लक्षात येते.
त्यांच्याबरोबर काम करणारे, त्यांच्या विरोधात उभे राहिलेले आणि प्रसंगी त्यांच्याशी संघर्ष केलेले—या सर्वांनाच त्यांचे जाणे वेदना देणारे आहे. कारण आशाताईंचे वाद विचारांचे होते; मनात वैर साठवून ठेवण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्या क्षणभर कडाडायच्या; पण दुसऱ्याच क्षणी मायेने जवळ घ्यायच्या. बाहेरून वज्रासारख्या कठोर दिसणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या अंतरंगात फुलासारखी कोमलता होती.
महिला आरक्षणाच्या आधाराने सार्वजनिक जीवनात प्रवेश करून केवळ नावापुरते प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या नेत्या नव्हत्या. महिला आरक्षणाच्या चौकटीच्या कितीतरी पलीकडे जाऊन त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर, संघर्षावर आणि जनसंपर्कावर स्वतंत्र नेतृत्व निर्माण केले. पुरुषप्रधान राजकारणाच्या खडकाळ भूमीवर स्वतःच्या हिमतीने पाय रोवून उभ्या राहिलेल्या आशाताईंचा प्रवास महाराष्ट्राच्या महिला नेतृत्वाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.
आज जुन्नरच्या डोंगरदऱ्या स्तब्ध आहेत. जिल्हा परिषदेच्या सभागृहातील त्यांचा आवाज शांत झाला आहे. प्रशासनाला जाब विचारणारी नजर मिटली आहे. कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे आधाराचे छत्र हरपले आहे. मात्र आशाताईंचा संघर्ष, त्यांनी दिलेला स्वाभिमानाचा मंत्र आणि सामान्य माणसासाठी सत्तेला प्रश्न विचारण्याची त्यांची निर्भय वृत्ती कायम प्रेरणा देत राहील.
जुन्नरच्या मातीतले वादळ आज थांबले असले, तरी त्या वादळाने पेटविलेल्या संघर्षाच्या ज्योती कधीही विझणार नाहीत. आशाताई शरीराने आपल्यातून निघून गेल्या; परंतु त्यांच्या आठवणींचा रणघोष काळाच्या पलीकडेही घुमत राहील.
ताई, तुमच्या संघर्षशील स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली!
— शरद बुट्टे पाटील