Inspects Development Works | खेड तालुक्याच्या विकासकामांची सभापती अमोल नलावडे यांच्याकडून पाहणी; निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन

शेतकरी कल्याण, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर भर; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

Inspects Development Works | खेड तालुक्याच्या विकासकामांची सभापती अमोल नलावडे यांच्याकडून पाहणी; निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन

 

महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्हा परिषद कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती अमोल नलावडे यांनी खेड तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

 

दौऱ्यादरम्यान चासकमान येथील शेतकरी श्रीमती मीना शंकर भवार यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होत असून शेती उत्पादन वाढीस चालना मिळत असल्याचे मत नलावडे यांनी व्यक्त केले. शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

त्यानंतर वाडा गावातील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करण्यात आली. ग्रामस्थांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक दुरुस्ती, पायाभूत सुविधा व विकासकामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 

यानंतर बुरसेवाडी येथील कृषी वैद्यकीय दवाखान्याची पाहणी करून तेथील सेवा-सुविधांची माहिती घेण्यात आली. शेतकरी आणि नागरिकांना अधिक चांगल्या व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. कृषी क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन मिळावे यासाठी कृषी विभागाने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

 

दौऱ्याच्या शेवटी खेड पंचायत समिती कार्यालयात सर्व विभागीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. विविध विभागांच्या सुरू असलेल्या आणि प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन नागरिकांशी संबंधित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. विकासकामांच्या अंमलबजावणीत कोणताही विलंब होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश नलावडे यांनी दिले.

 

या दौऱ्यात जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, सुनिता बुट्टेपाटील, दीप्ती भोगाडे, तनुजा घनवट, पंचायत समितीचे उपसभापती मंगेश सावंत, महेन्द्र मेदनकर, शंकर कावडे, निखिल थोरवे, दिनेश हांडे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, शाखा अभियंता कचरे, कृषी अधिकारी खेडकर तसेच विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना त्यांनी “खेड तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी कमी पडू देणार नाही. तालुक्यातील पायाभूत सुविधा, कृषी, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल,” असे आश्वासन दिले.