Crime beed to pune | प्रेमसंबंधासाठी स्वतःच्या ६ वर्षांच्या मुलाची क्रूर हत्या; आईने प्रियकराच्या मदतीने बालकाचा जीव घेतला
पुण्यातील कुरुळी येथे ६ वर्षांच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या ; आईने प्रियकराच्या मदतीने मुलाला बाथरूममध्ये पाण्याच्या बादलीत डोके बुडवून आणि भिंतीवर आपटून ठार मारले
महावार्ता लाईव्ह | प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या रागातून एका २७ वर्षीय आईने आपल्या ६ वर्षांच्या चिमुरड्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी आईने प्रियकराच्या साथीने मुलाला बाथरूममध्ये पाण्याच्या बादलीत डोके बुडवून आणि डोके भिंतीवर व जमिनीवर आपटून मारले. नंतर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेहाला हृदयविकाराचा झटका आल्याचे खोटे कारण सांगून बीड जिल्ह्यात नेले. मात्र, नातेवाईकांच्या संशयामुळे पोलिसांनी तपास करत दोघांचा पर्दाफाश केला.
ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडली. आरोपी महिला बसरिन मेहबूब शेख (वय २७) हिचे राम विनायक कजेवाड याच्याशी प्रेमसंबंध होते. या संबंधात तिचा मुलगा आवेज मेहबूब शेख (वय ६) अडथळा ठरत असल्याचे समजते. याच कारणावरून दि. ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास दोघांनी संगनमत करून आवेजची हत्या केली.
आरोपींनी बालकाला बाथरूममध्ये नेले. तेथे पाण्याच्या बादलीत त्याचे डोके बुडवले आणि डोके भिंतीवर व जमिनीवर जोरात आपटले. या क्रूर मारहाणीत चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर गुन्हा दडपण्यासाठी आरोपींनी मृतदेहाला अर्टिगा गाडीतून बीड जिल्ह्यातील धर्मापुरी (ता. परळी) येथे नेले. तेथे नातेवाईकांना सांगितले की, आवेजला हृदयविकाराचा झटका आला आणि तो मृत्यू पावला.
मात्र, फिर्यादी इसाक अहमद शेख (वय ४९) यांना या घटनेत संशय आला. त्यांनी तात्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवाल आणि आरोपींच्या संशयास्पद हालचालींमुळे दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल झाले.
पोलिसांनी बसरिन शेख यांची कसून चौकशी केली. सुरुवातीला ती उडवाउडवीची उत्तरे देत होती, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्हा कबूल केला. तिने प्रियकर राम कजेवाड याच्यासोबत केलेल्या संगनमताची माहिती दिली. सध्या बसरिन शेख यांना अटक करण्यात आली असून, राम कजेवाड याचा पोलीस शोध घेत आहेत.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) (हत्या), २३८, ६१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाय हे बारकाईने तपास करत आहेत.
या घटनेमुळे पुणे आणि बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधासाठी एका मातेने आपल्या रक्ताच्या नात्याचा बळी घेतल्याने स्थानिक स्तरावर संताप व्यक्त केला जात आहे. अशा निष्ठुर कृत्यांबाबत समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.