Khed | आळंदीत स्कुल बसचा आपघात

स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे ७० शाळकरी मुलांचा जीव बचावला  

Khed | आळंदीत स्कुल बसचा आपघात

राजगुरूनगर : चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कूलबस इंद्रायणी नदीवरील सुरक्षा कठडा तोडून पुढे गेली. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ४) दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास आळंदी मरकळ रस्त्यावरील दाभाडे सरकार चौकात घडली. चऱ्होली येथील स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे ७० शाळकरी मुलांचा जीव बचावला. 
 

गुरुवारी (दि.४) दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेजची स्कूल बस आळंदी-मरकळ रोडने विद्यार्थी घेऊन चालली होती. चऱ्होली येथील दाभाडे सरकार चौकाजवळ इंद्रायणी नदीवर बस आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. स्कूल बसने नदीवरील पुलाच्या सुरक्षा कठड्याला धडक दिली. कठडा तोडून बसच्या पुढील एक चाक आणि काही भाग पुलाच्या बाहेर गेला.

 

यावेळी बस मध्ये ७० विद्यार्थी होते. दरवाजाच्या बाजूचाच भाग कठडा तोडून गेल्याने बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर कसे काढायचे असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी स्कूलबसच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. या अपघातामुळे मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.